२१ वर्षे जुन्या प्रकरणात राजद उमेदवाराला अटक
विधानसभेसाठी अर्ज दाखल करताच झारखंड पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील सासाराम विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) उमेदवार सत्येंद्र साह यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सासाराम उपविभाग कार्यालयात पोहोचले होते, परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्यावर अटकेची नामुष्की आली आहे. झारखंडच्या गढवा पोलीस स्टेशन परिसरात 2004 मध्ये झालेल्या एका जुन्या दरोड्याप्रकरणी जारी केलेल्या कायमस्वरूपी वॉरंटच्या आधारे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
राजद उमेदवार सत्येंद्र साह यांच्या अटकेमुळे सासारामच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजद कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी सत्येंद्र साह यांना झारखंड पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर आता त्यांना गढवा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सत्येंद्र साह हे कारगहर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत.
नामांकन प्रक्रियेदरम्यान कडक पोलीस बंदोबस्तात साह यांना अटक केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. आरजेडी समर्थक याला राजकीय कट म्हणत आहेत. तसेच ही अटक निवडणूक रणनीतीवर प्रभाव पाडण्यासाठी केलेली कारवाई असल्याचा दावा केला जात आहे. तथापि, पोलिसांनी ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली असून त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन सुरू असताना ही घटना घडली आहे. सत्येंद्र सहा यांच्या अटकेमुळे राजदच्या निवडणूक रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. आता पक्षासमोर पर्यायी उमेदवार उभा करण्याचे आव्हान आहे. अन्यथा, सत्येंद्र सहा यांची उमेदवारी कायम ठेऊन निवडणुकीचा सामना करावा लागेल.
Comments are closed.