महापालिका आयुक्तांची दिवाळी कामगारांसोबत! कर्मचारी भारावले

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी चावीवाल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळीनिमित्त अचानक भेट घेऊन त्यांची ‘दिवाळी गोड’ केली. मुंबईला नियमितपणे पाणीपुरवठा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका चावीवाल्यांची असते. या पार्श्वभूमीवर आयुक्त गगराणी यांनी पत्नी डॉ. शीतल गगराणी यांच्यासह चावीवाल्यांचे कुटुंब, लहान मुले यांच्याशी संवाद साधला.

कुर्ला कामगार नगर येथील वसाहतीला भूषण गगराणी यांनी चावीवाले कंपचालक, कामगार, कर्मचारी यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. आपल्या संस्थेचे प्रमुख थेट आपल्या दारी आलेले पाहून चावीवाले, कंपचालक, कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दीपोत्सवाचे रंग उजळले. खुद्द आयुक्तच आपल्या घरी आल्याने चावीवाल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. गगराणी दांपत्याने घरोघरी जाऊन दिवाळीचा फराळ शुभेच्छा भेट म्हणून दिला. अनेकांच्या घरात वृद्ध आई-वडील होते, लहान मुलं होती; त्यांच्याशीही गगराणी दांपत्याने गप्पा केल्या, त्यांची विचारपूस केली.

Comments are closed.