आयुष-ॲलोपॅथी डॉक्टरांबाबत मोठ्या खंडपीठात सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने घेतला निर्णय : समान वेतन, सेवानिवृत्ती लाभांचा मुद्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयुर्वेद, यूनानी, होमियोपॅथी यासारख्या वैद्यकीय पद्धतींचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांना सेवा अटी, सेवानिवृत्तीचे वय आणि वेतन निर्धारित करण्यासाठी त्यांना अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या समान मानले जाऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या पीठाकडे सोपविली आहे.
शासकीय रुग्णालये आणि क्लिनिकांमध्ये आयुष चिकित्सकांच्या तुलनेत आधुनिक वैद्यकीय पद्धतींचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय वेगळे असू शकते का असा प्रश्न विचारणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी करत 13 मे रोजी सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायाधीश के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.
दोन्ही पद्धतींच्या डॉक्टरांना सेवा लाभांसाठी समान मानले जाऊ शकते का यावर मतभेद आहेत, याचमुळे या मुद्द्यावर अधिकृत निर्णयाची आवश्यकता आहे. आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या समान सेवानिवृत्ती लाभ आणि वेतन मिळू शकते की नाही यावर पूर्वीच्या निर्णयांमध्ये वेगवेगळी भूमिका घेण्यात आली होती असे न्यायालयाने म्हटले आहे.
जनतेचा उपचार करण्यासाठी पुरेसे अनुभवी चिकित्सक उपलब्ध व्हावेत या उद्देशानुसार अॅलोपॅथिक डॉक्टरांचे सेवानिवृत्ती वय वाढविल्याच्या राज्यांच्या युक्तिवादाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. अॅलोपॅथीमध्ये चिकित्सकांची कमतरता आहे, परंतु स्वदेशी चिकित्सा पद्धतींमध्ये अशी स्थिती नाही. खासकरून स्वदेशी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांकडून महत्त्वपूर्ण जीवनरक्षक चिकित्सा आणि शल्यचिकित्सा देखभाल केली जात नाही. परंतु या मुद्द्यावर एक अधिकृत निर्णय व्हायला हवा आणि याचमुळे आम्ही हे प्रकरण मोठ्या पीठाकडे वर्ग करत आहोत. या प्रकरणाला प्रशासकीय बाजूद्वारे सरन्यायाधीशांसमोर मांडण्यात यावे असा निर्देश रजिस्ट्रीला देत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
Comments are closed.