भारत लहान अणुभट्ट्या विकसित करणार आहे
कोणत्याही ठिकाणी बसविता येणार : 2047 पर्यंत 100 गिगावॅट्सचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील आहे. यासंदर्भात देश 200 मेगावॅट्स पर्यंत क्षमतेच्या छोट्या अणुभट्ट्या विकसित करत आहे. या अणुभट्ट्या व्यावसायिक जहाजांसह कुठेही बसवता येऊ शकतात. अशा लघु अणुभट्ट्या जहाजावरही बसविणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत अणुऊर्जा क्षमता सध्याच्या 8.8 गिगावॅटवरून 100 गिगावॅटपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
अणुविभाजनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेपासून अणुऊर्जा निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मिती शक्य होणार आहे. सध्या भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ दोन अणुभट्ट्या विकसित करत आहेत. यापैकी एक 55 मेगावॅट्सची तर दुसरी 200 मेगावॅट्सची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अणुभट्ट्या सिमेंट उत्पादनासारख्या उच्च ऊर्जेच्या गरजा असलेल्या कंपन्यांच्या कॅप्टिव्ह पॉवर प्लांटमध्ये बसवता येणार आहेत. अशा अणुभट्ट्या नौदलाच्या जहाजांमध्येदेखील वापरल्या जाऊ शकतात, असे त्यांनी पुढे सांगितले.
भारतात सध्या दोन स्वदेशी निर्मित अणुपाणबुड्या आहेत, आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या अणुपाणबुड्या 83-मेगावॅट अणुभट्ट्यांद्वारे चालवल्या जातात. तिसरी अणुपाणबुडी ‘आयएनएस अरिधमान’वरील चाचणी सध्या सुरू आहे. खासगी कंपन्यांना नागरी अणु क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी देण्यासाठी अणुऊर्जा कायदा 1962 मध्ये सुधारणा करण्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकार खासगी कंपन्यांना अणुऊर्जा प्रकल्प चालवण्याची आणि अणुइंधन चक्राचे सुरुवातीचे टप्पे देखील हाताळण्याची परवानगी देऊ शकते.
Comments are closed.