अ‍ॅडिलेडमध्ये गोलंदाजांचा कहर की फलंदाजांचे वर्चस्व? जाणून घ्या संपूर्ण पिच रिपोर्ट

पर्थमध्ये भारतीय संघासाठी काहीच योग्य घडले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्या कमबॅक सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरले, तर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. संघातील गोलंदाजही फॉर्म गमावलेले दिसले, ज्याचा कांगारू फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला.

सिरीजमध्ये 0-1 ने पिछाडीवर गेल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष्य अ‍ॅडिलेडमध्ये दमदार पुनरागमन करण्याचे असेल. हे मैदान “किंग कोहली”च्या आवडत्या मैदानांपैकी एक असून येथे त्याचा विक्रम अप्रतिम राहिला आहे. दुसरीकडे, मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ दुसरा वनडे जिंकून सिरीज आपल्या नावे करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

अ‍ॅडिलेडमध्ये हे ऑस्ट्रेलियातील त्या मैदानांपैकी एक आहे, जिथे फलंदाजांची चांगलीच मेजवानी असते. या पिचवर उत्तम उंची आणि बाउन्स असल्यामुळे चेंडू बॅटवर अतिशय छान येतो. त्यामुळे फलंदाजांना चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. मात्र, सुरुवातीच्या षटकांत पिचमध्ये ओलावा असल्यामुळे वेगवान गोलंदाजांनाही चांगली मदत मिळते. म्हणजेच, सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाजांनी सुरुवातीला सावधपणे खेळणे गरजेचे असते.

एडिलेडने आतापर्यंत एकूण 94 सामन्यांचे आयोजन केले आहे. त्यापैकी 49 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, तर 43 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने आपल्या नावे केले आहेत. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे 225 इतकी आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी स्कोर 197 इतका राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 369 धावा केल्या आहेत, ज्याला या ग्राउंडवरील सर्वात मोठा स्कोर मानला जातो. तर दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध कांगारू संघ फक्त 70 धावांवर गारद झाला होता, जो या मैदानावरील सर्वात कमी स्कोर आहे. 303 धावांचे लक्ष्य या मैदानावर यशस्वीपणे चेस करण्यात आले आहे.

Comments are closed.