सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला, पॅकर्स अॅण्ड मुव्हर्सच्या नावाने गैरकारभार

पॅकर्स अॅण्ड मुव्हर्स या नामांकित कंपनीच्या नावाने सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने किमती ऐवजांची चोरी करणाऱ्या एका टोळीच्या काळाचौकी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्या टोळीला जेरबंद करून पोलिसांना काळाचौकी आणि शीव येथे घडलेल्या गुह्यातील सर्व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे.
पॅकर्स अॅण्ड मुव्हर्स या नामांकित कंपनीच्या नावाने सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने काही चोरट्यांनी शीव येथून आठ लाख 80 हजारांचे सोन्याचे दागिने तसेच काळाचौकी येथून तीन लाख 40 हजार किमतीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनंत सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित भोसले तसेच गोपाळ चव्हाण, पराग शिंदे, खांडेकर, विजय सोनावणे या पथकाने तत्काळ तपास सुरू केला.
तांत्रिक बाबी व खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी शीव येथील गुह्यातील मुख्य सूत्रधार संदीप विश्वकर्मा (27) याला उचलले. त्याच्याकडून आठ लाख किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कांदिवली येथून प्रवीण पांडे (26), दुर्गेश मिश्रा (26), राकेश यादव (20), पिंटू सिंग (18) या चौघांना पकडले. या सर्व आरोपींकडून चोरीचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
स्वस्तात मस्त… आणि संधीचा फायदा
पॅकर्स अॅण्ड मुव्हर्स या कंपनीच्या नावाखाली आरोपींनी संकेतस्थळावर विविध नावाने छोट्या कंपन्या सुरू केल्या होत्या. आम्ही स्वस्तात सामान शिफ्ट करून देऊ अशी जाहिरात ते करायचे. मग नागरिकांनी स्वस्तचा पर्याय निवडल्यानंतर आरोपी मिळालेल्या संधीचा गैरफायदा उचलायचे.
सामान भरताना किमती ऐवजांवर डल्ला
सामान शिफ्ट करण्यासाठी संबंधित ठिकाणी गेल्यावर आरोपी किमती ऐवजाचे पॅकेज हेरून ते फोडायचे. सोने-चांदीचे दागिने काढून घेतल्यावर पुन्हा ते पॅकेज व्यवस्थित पॅक करायचे अशी आरोपींची मोड्स ऑपरेंडी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.
Comments are closed.