स्वदेशी वस्तू स्वीकारा, तेल कमी वापरा!

पंतप्रधानांचे देशवासियांना पत्रातून आवाहन : ‘ऑपरेशन सिंदूर’मधून अन्यायाचा बदला घेतल्याचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिवाळीनिमित्त पत्राच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी दिवाळी सणाचे वर्णन ऊर्जा, उत्साह आणि आत्मपरीक्षणाचे प्रतीक असल्याचे सांगितले. तसेच आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पावले टाकण्यासाठी स्वदेशी वस्तू स्वीकारा आणि आरोग्यमय जीवन जगण्यासाठी जेवणामध्ये खाद्यतेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करा, असा मौलिक सल्लाही दिला. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भव्य बांधकामानंतर ही दुसरी दिवाळी असून धर्माचे रक्षण आणि धैर्याने अन्यायाशी लढण्याच्या भगवान श्रीरामांच्या आदर्शांचे स्मरण करण्याची ही वेळ असल्याचे नमूद करत त्यांनी अनेक गोष्टींवर परखड भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त देशवासियांना पत्र लिहून मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीराम आपल्याला धर्माचे पालन करण्याचे आणि अन्यायाशी लढण्याचे धैर्य देतात. याचे एक ज्वलंत उदाहरण काही महिन्यांपूर्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दिसून आले, जेव्हा भारताने धर्माचे समर्थन केले आणि अन्यायाचा बदला घेतला, असा दावा पंतप्रधानांनी केला. तसेच मोदींनी पत्रातून देशवासियांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, अलिकडच्या काळात अनेक लोकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करत संविधानावर विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी हे देशासाठी एक मोठे यश असल्याचे वर्णन केले. देशाने अलिकडेच पुढील पिढीतील सुधारणा सुरू केल्या आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ भावनेला प्रोत्साहन द्या

पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना सामूहिक जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्वांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे, ‘एक भारत, श्रेष्ठ भारता’च्या भावनेला प्रोत्साहन देण्याचे, सर्व भाषांचा आदर करण्याचे, स्वच्छता राखण्याचे, आरोग्याला प्राधान्य देण्याचे, अन्नातील तेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचे आणि योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. दिवाळीच्या प्रतीकात्मक अर्थाचा संदर्भ देताना जेव्हा एक दिवा दुसरा दिवा लावतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी होत नाही तर वाढतो असे सांगत त्यांनी लोकांना सुसंवाद, सहकार्य आणि सकारात्मकता पसरवण्याचे आवाहन केले. आपण सर्वांनी अभिमानाने स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करूया. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना पुढे नेऊन ‘विकसित भारत’ आणि ‘स्वावलंबी भारत’ निर्माण करण्यात योगदान द्या, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

न्याय आणि धर्माचे रक्षण आवश्यक

पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूर हे न्याय आणि धर्माचे रक्षण करण्याचे अलीकडील उदाहरण म्हणून उद्धृत केले. या वर्षीची दिवाळी खास आहे कारण देशभरातील अनेक जिह्यांमध्ये, अगदी दुर्गम भागातही दिवे लावण्यात आले होते. हे भाग नक्षलवाद आणि माओवादी बंडखोरीपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा आणि संविधानावर विश्वास व्यक्त करण्याचा निर्णय घेणाऱ्यांचेही मोदींनी कौतुक केले.

संकटाच्या काळात भारताची आघाडी

अलीकडील आर्थिक सुधारणांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, ‘जीएसटी बचत महोत्सवा’दरम्यान कमी जीएसटी दरांमुळे नागरिकांचे हजारो कोटी रुपये वाचले आहेत. त्यांनी भारताच्या जागतिक स्थानावरही प्रकाश टाकला आणि म्हटले की आज भारत ‘स्थिरता आणि संवेदनशीलतेचे’ प्रतीक बनला आहे आणि लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास सज्ज असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.

Comments are closed.