Mumbai – जोगेश्वरीतील जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग; काही जण अडकल्याची भीती, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागातील जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग लागली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली असून 4 मजले आगीच्या कचाट्यात सापडले आहेत. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. या इमारतीमध्ये काही जण अडकल्याचीही भीती व्यक्त होत आहे.
#पाहा | महाराष्ट्र: मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागातील जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी हजर. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. pic.twitter.com/OvJVEn65X2
— ANI (@ANI) 23 ऑक्टोबर 2025
प्राथमिक माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिममधील बेहराम बाग भागात एस.व्ही. रोडवर असलेल्या बिझनेस सेंटरला सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागली. या बहुमजली इमारतीमध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिस आहेत.
सातव्या मजल्यावर आग लागल्यानंतर धुराचे लोट येऊ लागताच अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून इमारतीत अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, ही लेव्हल 2 ची आग असून यात कोणालाही दुखापत झालेली नाही. आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सातव्या मजल्यावरून एका ऑफिसमध्ये ही आग लागली असून नंतर ती पसरली, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने दिली.
Comments are closed.