बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, आता येथील राजद, काँग्रेस महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. महाआघाडीने राजदचे प्रमुख आणि माजी मंत्री तेजस्वी यादव (तेजस्वी यादव) यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले आहे. बिहार विधानसभा 2025 साठी महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा (Chief minister) चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांचे नाव घोषित केल्यानंतर जनशक्ती जनता दलचे प्रमुख आणि त्यांचे बंधू तेजप्रताप यादव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने अनकेांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाआघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार, राजदचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील आणि विकासशील इंसान पार्टी (वीआईपी) चे प्रमुख मुकेश सहनी उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे, बिहारमध्ये महाआघाडीकडून दोन महत्त्वाच्या पदासाठी नावे जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसला काय मिळणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच, बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यास एनडीएप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसला देखील उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते किंवा विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसला संधी मिळू शकते.
राहुल गांधींसह आमच्या डोक्यात तेजस्वी यादव यांचेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित होते. कारण, गत 2020 च्या निवडणुकीत देखील त्यांनी कमाल केली होती. विजयाच्या उंबरठ्यावर ते पोहोचले होते, पण पैशाच्या जोरावर एनडीएने काही मतांच्या फरकाने सत्ता मिळवली, असेही गेहलोत यांनी म्हटले.
जेवढी प्रतिक्षा आपल्या सर्वांनी होती, तितकीच प्रतिक्षा मलाही होते, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित केल्यानंतर महाआघाडीतील सर्वच पक्षांचे आभार मानले. राज्यातील डबल इंजिनवालं एनडीए सरकार भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमध्ये अडकून पडलं आहे. आता, नवयुवकांसह नवा बिहार घडवायचा आहे, या सत्ताधाऱ्यांना उखडून फेकायचं आहे, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले. दरम्यान, तेजस्वी यांचे बंधू तेजप्रताप यादव यांच्या प्रतिक्रियेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तेजप्रताप म्हणाले, मुख्यमंत्री जनता ठरवते
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे बिहारची जनता ठरवते, नेतेमंडळी थोडंच ठरवतात? असं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं. त्यावरुन, तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्रीपदासाठी भाऊ तेजस्वी यांचं नाव जाहीर केल्याने खुश नाहीत, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
हेही वाचा
ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी
आणखी वाचा
Comments are closed.