IND Vs AUS – टीम इंडियाचा फुसका बार; सलग दुसऱ्या सामन्यात कंगारूंची सरशी, मालिकाही जिंकली

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेली तीन सामन्यांची वनडे मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा जिंकण्यासाठी 265 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 2 विकेटने सामन्यासह मालिकाही जिंकली आहे.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाला 17 या धावसंख्येवर सलग दोन मोठे हादरे बसले. कर्णधार शुभमन गिल (9) आणि विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा (73) आणि श्रेयस अय्यर (61) यांनी डाव सावरल्यामुळे टीम इंडियाची गाडी पुन्हा रुळावर आली. त्यानंतर अक्षर पटेल (44) याने संयमी फलंदाजी केली. मात्र, इतर फलंदाजांची कामगिरी सुमार राहिल्यामुळे टीम इंडियाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 264 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झंपाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर, बार्टलेटने 3 आणि मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया पहिला हादरा मिचेल मार्शच्या स्वरुपात 31 या धावसंख्येवर बसला. त्यानंतर ट्रेव्हिस हेड (28) हा सुद्धा स्वस्तात माघारी परतला. परंतू त्यानंतर मॅट शॉर्टने 74 धावांची झुंजार खेळी केली. त्याला मॅट रेनशॉची (30) चांगली साथ मिळाली. त्यानंतर आलेल्या अॅलेक्स कॅरीला (9) वॉशिंग्टन सुंदरने फार काळ मैदानात टिकू दिले नाही. 132 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट पडल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाला पटापट विकेट काढून सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याची संधी होती. मात्र, टीम इंडियाच्या या उत्साहावर कुपर कॉनोलीने पाणी फेरलं. त्याने 53 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावांची वियजी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 22 चेंडू राखत दोन विकटने जिंकला आणि मालिक सुद्धा 2-0 अशी जिंकली. अर्शदिप सिंग, हर्षित राणा, वॉशिंगट्न सुंदर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Comments are closed.