तेजस्वी यादव यांनी बिहार महाआघाडीचे नेतृत्व स्वीकारले

महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अशी घोषणा : मुकेश सहनी यांचाही हट्ट पूर्ण : सत्ता आल्यास एकाहून अधिक उपमुख्यमंत्री

वृत्तसंस्था/पाटणा

बिहार निवडणुकीवरून महाआघाडीने गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यांची घोषणा केली. पूर्ण महाआघाडी एकजूट असून बिहारमध्ये परिवर्तन घडविण्यास तयार असल्याचा दावा करत  तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असे जाहीर करण्यात आले. तर मुकेश सहनी यांना उपमुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित करण्यात आले. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यास अन्य समुदायांशी संबंधित उपमुख्यमंत्री केले जातील, असे काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी सांगितले.

इंडी आघाडीने लोकसभा निवडणुकीत रालोआला चांगली लढत दिली. मागील निवडणुकीत महाआघाडी किरकोळ मतांच्या फरकांनी सत्तेपासून दूर राहिली. रालोआ घटनात्मक संस्थांचा दुरुपयोग करू पाहत आहे, रालोआचे लोक निवडणूक जिंकण्यसाठी काहीही करण्यास तयार आहेत. या निवडणुकीत पुढील मुख्यमंत्री म्हणून आम्ही तेजस्वी यादव यांची निवड करत असून त्यांनी आतापर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. तर मुकेश सहनी यांचा पक्ष महाआघाडीच्या प्रमुख पक्षांपैकी एक आहे, त्यांची प्रतिमा पाहता महाआघाडीने त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला असल्याचे गेहलोत यांनी म्हटले.

महाआघाडी नवा बिहार साकार करणार असून याचमुळे आम्ही एकजूट झालो आहोत. नितीश कुमार सरकारला सत्तेवरून दूर करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांवर रालोआत अन्याय करण्यात आला आहे. रालोआने एकदाही संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली नाही. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीश यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही असा दावा तेजस्वी यांनी केला.

भाजप नितीश कुमारांच्या पक्षाला संपवू पाहत आहे. भाजपचे केंद्रात सरकार आहे, तरीही देशातील सर्वात गरीब आणि मागासलेले राज्य बिहार आहे. आतापर्यंत 70 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही. रालोआ सरकारने उभारलेले पूल सातत्याने कोसळत आहेत. राज्यात दररोज गोळीबार होत आहे. भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे लोक त्रस्त झाले आहेत. महाआघाडीचे सरकार स्थापन होताच प्रत्येक परिवारात एक सरकारी नोकरी देण्यात येईल. तसेच माई-बहिण मान येजना लागू करू आणि 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध करण्यात येईल. जीविका दीदीला स्थायी नोकरी आणि दर महिन्याला 30 हजार रुपये देण्यात येईल, असे आश्वासन तेजस्वी यांनी दिले आहे.

मिळून प्रचार करू : गेहलोत

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय पर्यवेक्षक अशोक गेहलोत यांनी राजदप्रमुख लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची पत्रकार परिषदेपूर्वी भेट घेत चर्चा केली. यादरम्यान जागावाटपाचा वाद, प्रचारासमवेत अनेक मुद्द्यांवर बोलणे झाले. महाआघाडी एकजूट होत निवडणूक लढवत आहे, बिहारमध्ये एकूण 243 जागा आहेत आणि 5-10 जागांवर परस्पर सहमतीने  मैत्रिपूर्ण लढत होऊ शकते. आम्ही मिळून प्रचार करू आणि निवडणूक जिंकू, असे वक्तव्य गेहलोत यांनी केले आहे.

पोस्टरवर केवळ तेजस्वींच्या छायाचित्राला स्थान

महाआघाडीची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एका पोस्टरवरून वाद निर्माण झाला. यात केवळ तेजस्वी यादव यांनाच दर्शविण्यात आले. या पोस्टरनंतर राजकारण तापले. महाआघाडीच्या पत्रकार परिषद स्थळी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे छायाचित्र गायब झाल्याची टीका भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी केली. यानंतर काँग्रेस नेते उदित राज यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधीच बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची मुख्य जबाबदारी सांभाळणार असल्याचा दावा केला. तर महाआघाडीत सामील भाकप मालेचे नेते दीपांकर भट्टाचार्य यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा एकच असू शकतो, असे उत्तर देत वादावर अधिक बोलणे टाळले आहे.

Comments are closed.