नारायणन यांच्या पुतळ्याचे अनावरण केले
नारायणन यांचे जीवन प्रेरणेचे प्रतीक : मुर्मू
वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गुरुवारी केरळ राजभवन परिसरात माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या सोहळ्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन उपस्थित होते. के.आर. नारायणन यांचे जीवन साहस, मेहनत आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायक कहाणी आहे. शिक्षणाच्या शक्तीच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचून संधी आणि दृढनिश्चयाने सर्वकाही शक्य असल्याचे नारायणन यांनी दाखवून दिल्याचे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत.
भारतीय मूल्यांचे पालन
राजकारणात येण्यापूर्वी नारायणन यांनी भारतीय विदेश सेवेत आकर्षक कारकीर्द घडविली आणि नेहमी भारताची मूल्ये शांतता, न्याय आणि सहकार्याचे प्रामाणिकपणे पालन केले. नारायणन यांनी केवळ राष्ट्रपती म्हणून नव्हे तर उपराष्ट्रपती म्हणूनही देशाची सेवा केली. नारायणन नेहमीच केरळशी जोडलेले राहिले आणि राज्याची सामाजिक प्रगती, शिक्षण आणि समानतेच्या भावनेने प्रेरणा घेत राहिले असे वक्तव्य मुर्मू यांनी केले आहे.
लोकशाहीवादी मूल्यांचा वारसा
नारायणन यांचा नैतिकता, प्रामाणिकपणा, करुणा आणि लोकशाहीवादी मूल्यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरित करत राहणार आहे. नारायणन यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेत न्यायपूर्ण भारताच्या निर्मितीच्या दिशेने वाटचाल करायला हवी असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
Comments are closed.