कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही! तेल कंपन्यांवरील निर्बंधांनंतर पुतिन यांनी दंड थोपटले, टॉपहॉक क्षेपणास्त्रावरूनही दिला इशारा

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष मिटवण्यासाठी अमेरिकेने गुरुवारी कठोर पाऊल उचलले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या दोन खनिज तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले. यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तसेच टॉमहॉक क्षेपणास्त्रावरूनही पुतिन यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. त्यामुळे रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचे अमेरिकेच्या प्रयत्नांना खिळ बसण्याचीच शक्यता आहे.
अमेरिकेने रोसनेफ्ट आणि ल्युकोईल या दोन रशियन खनिज तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. यावर पुतिन यांनी कठोर शब्दात टिप्पणी केली असून अमेरिकाच काय कोणत्याही देशाच्या दबावापुढे झुकणार नाही, असे म्हटले आहे. तसेच रशियन सीमेच्या आतपर्यंत हल्ला करण्यात आले याचे प्रत्युत्तर गंभीर आणि प्रचंड असेल, अशी धमकीच पुतिन यांनी दिली. याआधी ट्रम्प यांनी तेल कंपन्यांवरील निर्बंध लादताना युक्रेनला क्षेपणास्त्र आणि इतर हत्यारे देण्याबाबत विचार केल्याचे म्हटले होते. याला आता पुतिन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
तेल कंपन्यांवर निर्बंध लादून मॉस्कोवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. पण रशिया अशा दबावाला जुमानत नाही आणि मॉस्को कुणाच्या दबावापुढे झुकणारही नाही. कुठलाही स्वाभिमानी देश किंवा स्वाभिमानी लोक अशा दबावापुढे झुकणार नाहीत, असे पुतिन म्हणाले. तसेच अमेरिकेचे हे पाऊल शत्रुत्वाची कृती असून यामुळे दोन्ही देशातील संबंध कमकुवत होतील, असे म्हणत या निर्बंधांचा रशियाच्या आर्थिक परिस्थितीवर फारसा परिणाम होणार नाही, असेही पुतिन म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, या निर्बंधांमुळे रशियाच्या आर्थिक परिस्थितीवर फारसा परिणाम होणार नाही, मात्र जागतिक ऊर्जा व्यापारावर गंभीर परिणाम होईल. यामुळे बाजार अस्थिर होऊन तेलाच्या किंमती गगनाला भिडतील. याचा फटका अमेरिकेला बसेल असा इशारा मी याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता.
युक्रेनला लांब पल्ल्याचे टॉपहॉक क्षेपणास्त्र देण्यावरूनही पुतिन यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. अशा हत्यारांचा वापर रशियात आतपर्यंत हल्ल्यासाठी करण्यात आला तर याचे परिणाम गंभीर होती. एवढेच नाही तर प्रचंड प्रत्युत्तर मिळेल. यावर त्यांना विचार करावा लागेल, असे पुतिन म्हणाले.

Comments are closed.