मुंबईचे शालेय क्रिकेट रचणार नवा इतिहास, हॅरिस आणि गाईल्स शील्डमध्ये विश्वविक्रमी संघांचा सहभाग

क्रिकेट विश्वातील सर्वाधिक जुनी आणि प्रसिद्ध असलेली मुंबई शालेय क्रीडा संघटनेची (एमएसएसए) हॅरिस शील्ड आणि गाईल्स शील्ड ही आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा नवा इतिहास रचणार आहे. या वर्षी प्रथमच हॅरिस शील्डमध्ये २०० पेक्षा अधिक शालेय संघांनी सहभाग नोंदवत सर्वोच्च संघांच्या विक्रमाची नोंद केली आहे. तसेच गाईल्स शील्डमध्येही विक्रमी संघांनी सहभाग नोंदवल्याची माहिती एमएसएसएचे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांनी दिली.

एमएसएसएच्या हॅरिस आणि गाईल्स शील्ड क्रिकेटला जगभरात मानाचे स्थान आहे. मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचा अभिमान जागतिक पातळीवर झळकवताना या शालेय स्पर्धांमधून क्रिकेट जगताला अनेक कोहिनूर दिले आहेत.

या वर्षी हॅरिस शील्डमध्ये तब्बल २०० शाळांच्या संघांनी भाग घेतला असून शालेय क्रिकेटच्या इतिहासात हा एक विश्वविक्रमच आहे. तर गाईल्स शील्डलाही १९७ उत्साही शाळांनी सहभाग दिला असून, मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांतील क्रिकेटच्या मुळाशी असलेल्या जोशाला आणखी बळ मिळाले आहे.

स्पर्धेच्या या यशामागे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पुढाकारामुळे शालेय क्रिकेटला आज प्रतिष्ठेचे मैदान आणि सुविधा लाभल्या आहेत. यंदाही या स्पर्धांचे सामने वानखेडे, बॉम्बे जिमखाना, पारशी, हिंदू, इस्लाम आणि पोलीस जिमखाना तसेच सर्व प्रमुख मुंबईच्या मैदानांवर खेळविले जाणार आहेत. तसेच खेळाडूंना पुरस्कार देण्याची प्रथाही गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील शालेय क्रिकेट कधी नव्हते इतके आज मजबूत झाले आहे. हॅरिस आणि गाईल्स शील्ड या केवळ स्पर्धा नाहीत, त्या आहेत हिंदुस्थानातील महान खेळाडूंची नर्सरी आहे. याच मैदानांतून सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजित वाडेकर यांसारख्या खेळाडूंनी आपला प्रवास सुरू केला.
नदीम मेमन, क्रिकेट सचिव

Comments are closed.