सिडनीत कोहली-रोहितचा अखेरचा सूर्योदय; शेवटच्या सामन्यात हिंदुस्थानला विजय मिळवून देण्यासाठी ऑस्ट्रेलियाशी संघर्ष

सकाळचा सूर्य अजून सिडनीच्या समुद्रावर नीटपणे उगवलाही नाही आणि क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात एकच विचार फिरतोय, ही जोडी पुन्हा ऑस्ट्रेलियन भूमीवर दिसेल का? हो, विराट कोहली आणि रोहित शर्माचीच जोडी. एकेकाळी ज्यांच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नसा गोठवल्या, ती जोडी आता बहुधा ‘गुड डे मेट’ म्हणत शेवटचा नमस्कार करायला सज्ज झाली आहे. एकदिवसीय मालिका गमावली असली तरी मालिकेचा शेवट सुखद करण्याची धडपड हिंदुस्थानी संघ नक्कीच करील.

ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुनरागमनाची प्रचंड चर्चा होती. पूर्ण दौराच त्यांच्या अवतीभवती गटांगळय़ा खात होता. पण कोहलीने पहिल्या दोन सामन्यांत निराश केले. ‘शतकांचा किंग’ असलेला विराट सलग दोनदा शून्यावर बाद झाला. हे त्याच्यासारख्या महारथीस शोभणारे नव्हते. क्रिकेटमध्ये देवासमान असलेला विराट आता देवळाबाहेर पडतोय. विराटच्या तुलनेत रोहितने काही प्रमाणात आपली कलाबाजी दाखवली, पण त्यातही पहिल्यासारखा जोश नव्हता.

गंभीर गंभीर झाला तर काय होईल?

गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून तितकाच ‘सीरियस’ आहे जितका तो मैदानावर होता. त्याला क्लीन स्वीपचा क्लीन बोल्ड नकोय. पण आकडे सांगतात – सिडनीच्या या मैदानावर हिंदुस्थान सिडनीवर गेल्या दोन वर्षांत पाच वन डे खेळलाय, फक्त विजय एक! म्हणजे देव पण म्हणतोय, ‘थोडं रियाझ वाढवा, बेटा!’

कुलदीपचा 'एकूण' प्रश्न

गंभीर आणि गिल यांच्या रणनीतीत सर्वात मोठं कोडं म्हणजे कुलदीप यादवचा ‘गायब होणारा’ रहस्यकथेसारखा अध्याय.

अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या ‘अष्टपैलू फौजे’ने जरी बॅट चालवली असली तरी चेंडू फिरायचेच विसरलाय. ऑस्ट्रेलियन फलंदाज त्यांना खेळताना जणू नेट प्रॅक्टिस करत आहेत अशी भावना वारंवार निर्माण होतेय.

रेड्डी आणि राणा वापर च्या परीक्षा?

नीतिशला आठव्या क्रमांकावर खेळवणे म्हणजे जणू शाळेतल्या पहिल्या बाकावरच्या हुशार मुलाला मागच्या बाकावर बसवणे. हर्षित राणाच्या वेगातला उतार पाहून वाटलं, तो क्रिकेट नव्हे तर स्लो बॉलिंग योगा क्लास घेतोय!

आता गंभीरने प्रसिध कृष्णाला संधी दिली नाही तर त्याच्या ‘गंभीरपणा’ची थट्टा केली जाईल.

पुढील दोन वर्षे जप्ती नाही

आज खेळला जाणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा सामना आहे. पुढील दोन वर्षे उभय संघांत एकही सामना खेळला जाणार नाही. त्यामुळे ‘रो-को’ आज ऑस्ट्रेलियन भूमीला अखेरचा दंडवत घालेल. हा दोघांचा अखेरचा सामना असला तरी ते 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत खेळणार आहेत. त्यामुळे सिडनीत अखेरचा सलाम ठोकताना त्यांच्या खेळीने चाहत्यांच्या डोळय़ांत आनंदाश्रू यावेत ही सर्वांची मनापासून इच्छा आहे. म्हणूनच फटाक्यांपेक्षा मोठे स्फोट सिडनीच्या मैदानावर होतील आणि दोघांचाही जुना अवतार अनुभवता येईल, अशी अपेक्षा आहे.

रोहितचा 'थोडासा दिलासा

रोहितने दुसऱ्या सामन्यात 73 धावा ठोकून जरा दिलासा दिला, पण त्याची फलंदाजीही आता थोडी स्लो मोशनमध्ये धावणाऱ्या हत्तीची आठवण करून देते. पहिल्यांदा तो 2007-08 मध्ये या भूमीवर आला तेव्हा पोरगा होता. आता कर्णधार गिलच्या मार्गदर्शनाखाली खेळताना त्याचं ‘बाबा’पण स्पष्ट जाणवतंय.

भविष्यातून जागतिक विजेता बनण्याच्या तयारीत ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाने 2027 च्या विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे हे कुणीही सांगू शकतो. त्यांच्या ताफ्यात मॅथ्यू शॉर्ट, मिशेल ओवेन आणि कूपर कोनोली ही नवे त्रिकूट म्हणजे जणू भविष्याचे तीन सिंह. ते खेळतात शांतपणे, पण वार करतात सरळ हृदयावर! मॅट कुहनमॅन पुन्हा अंतिम अकरात येऊ शकतो. त्याच्या फिरकीत चेंडू नाही, ‘कुटिल हसू’ लपलेले असते.

Comments are closed.