मेस्सीचा मियामीसोबतचा करार वाढला

फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सी आता आणखी तीन वर्षे इंटर मियामीच्या रंगात झळकणार आहे. 38 वर्षीय मेस्सीने आपल्या कराराची मुदत वाढवत 2028 च्या अखेरपर्यंत क्लबबरोबर राहण्यास सहमती दर्शवली आहे. त्याचा सध्याचा करार डिसेंबर 2025 मध्ये संपणार होता.  इंटर मियामीचा सहमालक डेव्हिड बेकहॅम म्हणाला, आमचं ध्येय नेहमीच जगातील सर्वोत्तम खेळाडूंना मियामीच्या संघात आणण्याचं राहिलं आहे. मेस्सी अजूनही तितकाच समर्पित आहे आणि विजयाची भूक त्याच्यात कायम आहे. त्यामुळे त्याच्यासोबतचा करार वाढवण्यात आम्हाला आनंद आहे. 2023 मध्ये क्लबमध्ये दाखल झाल्यापासून मेस्सीने आतापर्यंत 82 सामन्यांत 71 गोल केले असून 37 असिस्ट दिल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे मियामीने 2023 लीग कप आणि 2024 सपोर्टर्स शील्ड जिंकण्याचा मान मिळवला आहे. अर्जेंटिनाचा हा विश्वचषक विजेता या वर्षी ‘एमएलएस गोल्डन बूट’ विजेता ठरला असून त्याने तब्बल 29 गोल केले आहेत. लीगच्या ‘एमव्हीपी’ पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्ये तो अग्रस्थानी आहे. बेकहॅम म्हणाला, ‘मेस्सीने अमेरिकन फुटबॉलचा चेहरामोहरा बदलला आहे. भविष्यात तो आमच्या क्लबचे नेतृत्व करेल, याचा आम्हाला अभिमान आहे.

Comments are closed.