'जाहिरातीचे महर्षी' पीयूष पांडे यांचे निधन
फेव्हीकॉल, कॅडबरी जाहिराती अतिशय लोकप्रिय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जाहिरातींच्या ‘इंग्रजी’ जगामध्ये हिंदी जाहिरातींना मानाचे स्थान मिळवून देणारे विश्वविख्यात जाहिरात महर्षी पियुष पांडे यांचे वयाच्या सत्तराव्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय जाहिरात विश्व दु:खसागरात बुडाले असून अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनासंबंधी दु:ख व्यक्त केले आहे. पियुष पांडे यांनी त्यांच्या कल्पक सृजनशीलतेतून भारतातच्या उद्योगविश्वातील अनेक ब्रँडस् घरोघरी पोहचविले आहेत. त्यांच्या जाहिरातींमधील अनेक वाक्ये आजही ज्याच्या त्याच्या तेंडी आहेत. कॅडबरी, फेव्हीकॉल आणि इतर अनेक ब्रँडस्च्या जाहिरात अभियानाचे नेतृत्व करत त्यांनी या ब्रँडस्च्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. 2016 मध्ये भारत सरकारने पीयूष पांडे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय, 2024 मध्ये त्यांना एलआयए लेजेंड पुरस्कार देखील मिळाला होता.
‘ये फेव्हीकॉलका जोड है, टूटेगा नही,’ ‘कुछ खास है’, ‘हर खुशी में रंग लाये,’ ही त्यांच्या विविध उत्पादनांच्या जाहिरातींमधील वाक्ये प्रत्येकाच्या तोंडी आजही आहेत. ‘अब की बार मोदी सरकार’ हे घोषवाक्यही त्यांनीच तयार केले होते. त्यांनी 1982 मध्ये ‘ओगिलव्ही अँड माथर इंडिया’ या कंपनीच्या माध्यमातून जाहिरात विश्वास पदार्पण केले होते. आपल्या कार्यकाळाचा प्रारंभ प्रशिक्षणार्थी अकाऊंटंट एक्झिक्युटिव्ह’ या निम्नस्तरावरच्या पदापासून करत त्यांनी कंपनीचे नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर, कार्यकारी अध्यक्ष आणि ग्लोबल चीफ क्रिएटिव्ह अधिकारी अशी विविध उच्च पदे भूषविली होती. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी या क्षेत्रात पहिले पाऊल टाकत स्वत:चे विशेष स्थान निर्माण केले होते.
‘ओगिलव्ही’चे यशस्वी नेतृत्व
आपल्या अद्भूत कल्पकतेच्या साहाय्याने त्यांनी ओगिलव्ही इंडिया या कंपनीला जागतिक सन्मान मिळवून दिला होता. त्यांनी निर्माण केलेल्या विविध जाहिरातींमधील नर्म विनोद आणि उत्पादनाचे महत्व ठसविण्यासाठी अर्थपूर्ण वाक्ये यांच्या मिश्रणामुळे त्या जाहिराती प्रचंड गाजल्या होत्या. संबंधित उत्पादनांच्या लोकप्रियतेमध्ये या जाहिरातींचे मोठे योगदान होते. त्यांच्या प्रभावी जाहिरात शैलीमुळे त्यांनी त्यांच्या कंपनीला भारतातील एक सर्वश्रेष्ठ जाहिरात कंपनी म्हणून सन्मान मिळवून दिला होता. एवढे प्रचंड यश मिळवूनही निगर्वीपणा आणि सर्वसामान्यांशी अतूट संपर्क ही वैशिष्ट्यो त्यांनी अखेरपर्यंत जपली होती. आचारातील आणि विचारांमधील साधेपणा त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. कोणीही व्यक्तीगतरित्या कितीही श्रेष्ठ असला तरी संघाचा विजय त्याच्या एकट्यामुळे होत नसतो. त्यासाठी सर्वांची कामगिरी व्हावी लागते, हे त्यांचे तत्व होते.
ऐतिहासिक कामगिरी
2004 मध्ये त्यांनी कॅनास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ज्युरी प्रेसिडेंट’ म्हणून उत्तरदायित्व सांभाळले होते. कोणत्याही भारतीयांची या स्थानावर निवड होण्याचा हा प्रथमच प्रसंग होता. ही त्यांची कामगिरी ऐतिहासिक ठरली होती. केवळ भारतीयच नव्हे, तर हे मानाचे पद मिळविणारे ते प्रथम आशियायीदेखील ठरले होते. सर्वसामान्यांच्या मानसिकतेचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या आणि त्यांच्या संस्कृतीशी मिळत्या जुळत्या अशा जाहिराती त्यांनी निर्माण केल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारतात नंतरच्या काळात अनेक स्थानिक भाषांमध्ये प्रभावी जाहिराती निर्माण करण्याच्या कार्याला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. जाहिरात क्षेत्रावरचे इंग्रजी भाषेचे वर्चस्व मोडून काढण्याचे श्रेय नि:संशयपणे त्यांना दिले जाते.
जाहिरात क्षेत्रातील तेजस्वी तारा
जयपूरमध्ये जन्मलेल्या पियुष पांडे यांच्या निधनासंबंधी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शोक व्यक्त केला आहे. ते भारताच्या जाहिरात क्षेत्रातील तेजस्वी तारा होते. त्यांच्या निधनामुळे देशातील जाहिरात क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. मात्र, त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवक त्यांचा हा देदिप्यमान वारसा पुढे चालवितील, असा संदेश सीतारामन यांनी दिला.
Comments are closed.