उद्या शिवसेनेचा निर्धार मेळावा! उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मेळाव्यात विभागप्रमुख, शाखाप्रमुख ते उपशाखाप्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये सायंकाळी 5 वाजता हा मेळावा होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या नियोजनाबाबत मुंबईतील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील. या मेळाव्यासाठी पुरुष आणि महिला पदाधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय विश्वाचेही लक्ष लागले आहे.

अशी करा निवडणुकीची तयारी

आगामी निवडणुकीसाठी कोणत्या प्रकारे काय तयारी करावी, मतदार याद्यांबाबत कोणती खबरदारी घ्यायची, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती कशी करायची आणि मतदारांना आवश्यक सहकार्य कसे करायचे याबाबत खुद्द उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

विरोधकांनी आवाज उठवूनही आयोग ढिम्म

  • मतदार यादीत घोळ असल्यास मतदान प्रक्रिया अयोग्य ठरते. मतदार याद्यांच्या घोळाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पुराव्यानिशी ही बाब उघड केली आहे.
  • शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्ष मतचोरी, दुबार नावे, खोटी ओळखपत्रे आणि पत्त्यांवरून रान उठवत आहेत. याबाबत आयोगाकडे जोरदार पाठपुरावाही करण्यात आला.
  • मात्र निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा निर्धार मेळावा मतदान प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याच्या टीझरला सध्या प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘निर्धार मुंबईच्या भविष्याचा, भूमिपुत्रांच्या उत्कर्षाचा, मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्याचा…’, ‘निर्धार मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीने भगवा फडकवण्याचा..!’, ‘निर्धार संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा!’ अशा आशयाचा हा टीझर आहे.

Comments are closed.