मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये, श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना बसला जबरदस्त मार, BCCI ने दिली माहिती


श्रेयस अय्यर दुखापती अपडेट: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला क्लीन स्वीपपासून वाचवले. मात्र, या सामन्यात फिल्डिंगदरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. या घटनेनंतर बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर बीसीसीआयकडून अपडेट

बीसीसीआयने काही वेळानंतर श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती दिली आहे. बोर्डने सांगितले की, फिल्डिंगदरम्यान अय्यरच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली असून, त्याला पुढील तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरच्या तपासण्यांचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

तीन आठवड्यांसाठी अय्यर बाहेर

पण, पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, “सामन्यादरम्यानच श्रेयसला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत डाव्या बरगडीला हलकी दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्याला किमान तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल. पुनरागमनापूर्वी त्याला बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ला अहवाल सादर करावा लागेल.”

अहवालात पुढे म्हटले आहे की, अजून काही वैद्यकीय तपासण्या बाकी आहेत. त्या आल्यावरच निश्चित सांगता येईल की अय्यरला पूर्ण बरे होण्यासाठी अधिक वेळ लागेल का. जर हेअरलाइन फ्रॅक्चर आढळले, तर त्याची पुनर्प्राप्ती आणखी उशीराने होऊ शकते.

पुढच्या वनडे मालिकेत खेळणार का?

भारतीय संघ काही आठवड्यांनंतर (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. सध्यातरी श्रेयस या मालिकेत खेळेल की नाही, याबाबत निश्चित सांगता येत नाही. जर तो तीन आठवड्यांत पूर्ण फिट झाला, तर त्याची पुनरागमनाची शक्यता आहे. श्रेयस अय्यर सध्या कंबरेच्या दुखापतीमुळे सहा महिन्यांच्या रेड-बॉल क्रिकेट ब्रेकवर आहे आणि त्याने बराच काळ टी20 सामनाही खेळलेला नाही. सध्या तो आपल्या वनडे कारकिर्दीत 3,000 धावांच्या उंबरठ्यावर असून, या टप्प्यापासून फक्त 83 धावा दूर आहे.

हे ही वाचा –

Ind vs Aus World Cup Semi Final : ठरलं तर मग! कशीबशी सेमीफायनलमध्ये पोचलेली टीम इंडिया दिग्गज ऑस्ट्रेलियाशी भिडणार, जाणून घ्या शेड्युल अन् A टू Z

आणखी वाचा

Comments are closed.