पाकिस्तान सीमेजवळ सर्वात मोठा युद्ध सराव

राजस्थानमध्ये 30,000 सैनिक जमणार : तिन्ही सुरक्षा दलांचा संयुक्त समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, जैसलमेर

राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर येत्या आठवड्यात 12 दिवसांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव होईल. लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे 30,000 सैनिक थारमध्ये संयुक्त सराव करतील. या सरावाला ‘त्रिशूल’ असे नाव देण्यात आले आहे. सुमारे 12 दिवसांचा हा सराव 30 ऑक्टोबरला सुरू होऊन 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या सरावादरम्यान सीमेवरील काही भाग नो-फ्लाय झोन जाहीर करण्यात आला आहे. हा सराव जैसलमेरपासून गुजरातच्या सर क्रीक प्रदेशापर्यंत होईल.

भारताने आपल्या पश्चिम सीमेवर सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेनादलांचा समावेश आहे. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांमधील संयुक्त सरावाच्या घोषणेमुळे पाकिस्तान घाबरला आहे. हा सराव भारताच्या पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील सर क्रीक-सिंध-कराची प्रदेशावर केंद्रित असेल. भारताने 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील संयुक्त सरावासाठी ‘नोटम’ जारी केली आहे. त्यामुळे अनेक पाकिस्तानी कमांड आणि तळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच हवाई वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

पाकिस्तानने सिंध आणि दक्षिण पंजाबमधील दक्षिण कमांडसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. कोणत्याही संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दल आणि नौदलाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सूत्रानुसार, पाकिस्तानच्या बहावलपूर स्ट्राइक कॉर्प्स आणि कराची (सिंध) कॉर्प्सना विशेष सतर्क केले आहे. तसेच पाकिस्तान नौदलाला देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शोरकोट, बहावलपूर, रहीम यार खान, जेकबाबाद, भोलारी आणि कराची हवाई तळांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. चिंताग्रस्त पाकिस्तानने नौदलाला अरबी समुद्रात गस्त आणि ऑपरेशन्स वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

पाकिस्तान भीतीच्या छायेखाली

पाकिस्तानचा सुमारे 70 टक्के व्यापार कराची आणि बिन कासिम बंदरातून होत असल्यामुळे तो एक धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील प्रदेश बनला आहे. सुरक्षा सूत्रांचे म्हणणे आहे की दक्षिणेकडील प्रदेशावर लक्ष केंद्रित करून, भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की ते केवळ पंजाब किंवा काश्मीरमध्येच नव्हे तर अनेक आघाड्या उघडू शकते. सर क्रीक-बदीन-कराची प्रदेश हा पाकिस्तानच्या सर्वात असुरक्षित प्रदेशांपैकी एक आहे. तो तुलनेने सपाट आणि लष्करीदृष्ट्या असुरक्षित आहे. या भागात कोणताही यशस्वी हल्ला किंवा विस्तारित कारवाई कराचीला वेगळे करू शकते. या कृतीमुळे पाकिस्तानचा सागरी व्यापार आणि ऊर्जा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.

Comments are closed.