एका वृद्धाचा पराक्रम
भारताच्या उत्तराखंड या राज्यात नुकतीच घडलेली ही अद्भूत, तितकीच प्रेरणादायी घटना आहे. ओलेना बाईको नामक एका ब्रिटीश वृद्धेने हा पराक्रम केला आहे. या साहसी महिलेने वयाच्या 83 व्या वर्षी ‘बंजी जंपिंग’ केले आहे. तिने 117 मीटर उंचीवरुन (चाळीस मजली इमारतीची उंची) उडी मारुन एक नवा विश्वविक्रम केला आहे. त्यांच्या या बंजी जंपिंगचे व्हिडीओ सोशल मिडियावरुन प्रसिद्ध होत असून अनेकांनी या महिलेल्या असामान्य धाडसाचे कौतुक केले आहे.
माणूस वयाने केवळ वाढतो. पण म्हातारपण हे वयावर अवलंबून नसते. ते मानसिक स्थितीवर अवलंबून असते, असे म्हटले जाते. हे या महिलेने अक्षरश: खरे करुन दाखविले आहे. ज्या वयात साधे चालणेही कित्येकांना साहाय्य घेतल्याशिवाय शक्य नसते, त्या वयात असा पराक्रम करणे, ही सामान्य बाब नसून तरुणांनीही या महिलेचा आदर्श घेतला पाहिजे, अशा अर्थाच्या कॉमेंट सोशल मिडियावर केल्या जात आहेत. या त्यांच्या ‘ऐतिहासिक उडी’साठी त्यांनी आधी सराव केला होता. बंजी जंपिंग हा एक साहसी क्रीडाप्रकार आहे. वीशी-पंचविशीतील तरुण-तरुणींसाठीही हा क्रीडाप्रकार आव्हानात्मक मानला जातो. तथापि, या महिलेने अगदी लीलया ही उडी घेऊन तिची क्षमता आणि उत्साह यांचे या वयातही दर्शन घडविले आहे. ही उडी घेताना त्यांच्यावर कोणतेही दडपण नव्हते. त्यांनी या उडीमधील धोक्यांची पूर्ण माहिती आधी घेतली होती आणि स्वत:च्या इच्छेने हा धोका त्यांनी पत्करला होता, अशी माहिती त्यांनी स्वत: हा विक्रम केल्यानंतर दिली आहे. अनेक मान्यवरांनीही त्यांची प्रशंसा केली आहे. आपण या क्रीडाप्रकारात केवळ आनंद घेण्यासाठी भाग घेतला होता, असे या बाईंचे म्हणणे आहे. धाडसाला वयाचे बंधन किंवा मर्यादा नसते. ही एक प्रवृत्ती आहे आणि नैसर्गिक असली, तरी ज्यांच्याकडे ती आहे, त्यांनी ती प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते. उत्साह आणि शारिरीक क्षमता या दोन बाबींची अशा क्रीडाप्रकारांसाठी आवश्यकता असते. हे दोन गुणधर्म ज्या व्यक्तीत आहेत, त्या व्यक्तीचे वय कितीही असले, तरी त्याने कोणतेही अंतर पडत नाही. निर्धार हा नेहमी वयावर मात करतो, असे या महिलेचे म्हणणे आहे. सकारात्मक, प्रेरणादायक आणि कौतुकास्पद विक्रम, असे या घटनेचे वर्णन सोशल मिडियावरुन केले जात आहे.
Comments are closed.