उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

अचानक दिल्ली दौऱ्यावर : महायुतीमधील कुरबुरीवर करणार चर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम तडकाफडकी रद्द करत अचानक दिल्लीकडे धाव घेतली आहे. हा दौरा पूर्वनियोजित नसतानाही, ते दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. ठाण्यासह राज्यातील काही ठिकाणी शिंदे सेना आणि भाजपमधील कुरबुरी वाढल्या आहेत. तर शिंदे सेनेच्या आमदारांना निधी देण्यावरूनही नाराजी नाट्या आहे. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

शनिवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. दिल्लीतील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यात शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत त्यांनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि

तुकाराम महाराजांची मूर्ती भेट

दिली. पेंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ‘या निवडणुका ग्रासरूट लेव्हलच्या असतात. कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतफत्त्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीत दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब आहे. ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे  आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

महायुतीमधील अंतर्गत मतभेदांबाबत शिंदे यांनी सांगितले, ‘महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत. मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी,’ असे त्यांनी सांगितले. पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना, ‘धंगेकरांना मी स्पष्ट संदेश दिला आहे, आवश्यक असल्यास मी स्वत: त्यांच्याशी बोलेन,’ असे शिंदे म्हणाले.

साताऱ्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. एका आरोपीला अटक झाली असून इतरांना लवकरच अटक होईल. दोषींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.

नाराजी की आगामी निवडणुकीची समीकरणांची बांधणी?

अचानक होत असलेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की, आगामी महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे अशी चर्चा सुरू आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अनेक ठिकाणी डावलत युती केली आहे. तर शिंदेचा गड असलेल्या ठाण्यात शिंदेंची कोंडी करण्याचे प्रयत्न केले जात आहे, त्यामुळे राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीं, विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

Comments are closed.