हा 'घुसखोर बचाव' प्रवास आहे.
अमित शहा यांचा राहुल गांधी यांच्यावर घणाघात
► वृत्तसंस्था/ पाटणा
भारतात मतदान करण्याचा अधिकार केवळ भारताचे वैध नागरीक असणाऱ्यांनाच मिळणार आहे. भारताच्या राज्यघटनेतच ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना प्रथम शोधले जाईल, नंतर त्यांना भारतातून बाहेर काढले जाईल आणि त्यांची नावे मतदारसूचीमध्ये असल्यास ती काढून टाकण्यात येतील, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार ते करीत आहेत. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढली होती. मात्र, ही मतदारांच्या अधिकारासाठी काढलेली यात्रा नसून ती घुसखोरांना वाचविण्यासाठी आहे, अशी टीका अमित शहा यांनी खगरिया येथे आयोजित भव्य जाहीर सभेत केली आहे.
राज्याच्या भवितव्यासाठी…
आगामी विधानसभा निवडणूक ही बिहारच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. ही निवडणूक केवळ कोणालातरी आमदार किंवा मुख्यमंत्री बनविण्यासाठी नसून राज्यात ‘जंगलराज’ पुन्हा आणायचे की सध्याचे ‘विकासराज’ राखायचे या प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीतून मिळणार आहे. जंगलराज परत आल्यास राज्य 50 वर्षे मागे जाईल. सध्याच्या विकासाभिमुख सरकारलाच लोकांनी पुन्हा संधी दिल्यास आणखी वेगाने प्रगती होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कायदा-सुव्यवस्था केली प्रस्थापित
2005 पूर्वी बिहारमध्ये जंगलराज होते. मात्र, गेल्या 20 वर्षांमध्ये आम्ही प्रयत्नपूर्वक या अन्यायी सत्तेचा अंत घडवून आणला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली आहे. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, हा विरोधकांचा प्रचार धादांत खोटा आहे. यादव कुटुंबाच्या राज्याचा लोकांना अतिशय वाईट अनुभव आहे. पुन्हा तो घेण्याची लोकांची इच्छा नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा या विधानसभा निवडणुकीत विजय होणार हे निश्चित असून आम्ही त्यानंतर राज्याच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
आघाडीतील एकजूट अभेद्य
सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकजूट अभेद्य आहे. बिहारमध्ये या आघाडीत पाच पक्ष असून ते जणू पाच पांडव आहेत. त्यांच्यासमोर राज्यावर अन्याय करणाऱ्या शक्ती टिकणार नाहीत. आमचा पुन्हा विजय झाल्यानंतर आम्ही विकासाची गती वाढविणार आहोत. संपूर्ण भारतात बिहार हा विकासाचे एक सर्वोच्च उदाहरण म्हणून समोर यावा, अशी आमची भावना आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांचा मताधिकार अत्यंत दक्षतापूर्वक उपयोगात आणावा. जराशी जरी चूक झाली तर गेल्या 20 वर्षांमध्ये जो विकास साध्य झाला आहे, तो पाण्यात जाईल. त्यामुळे विरोधकांच्या आश्वासनांना भुलून जाण्याचा मोह मतदारांनी टाळावा. राज्याचे हित लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी सभेत केले.
Comments are closed.