Beauty Tips: चहा पावडर चेहऱ्यासाठी ठरते बेस्ट; असे करा स्किनकेअर

स्किनकेअरसाठी अनेकदा आपण महागडी उत्पादने वापरतो पण तरीही त्याचा परिणाम दिसत नाही. उलट कधीकधी या उत्पादनांमुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे ही उत्पादने वापरण्याऐवजी तुम्ही घरात सहज उपलब्ध असलेला एक घटक वापरून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. चहा पावडर ही प्रत्येकाच्या घरात असतेच आणि ती त्वचेसाठी उत्तम पर्याय ठरते. त्यामुळे चहा पावडरचा वापर तुम्ही तुमच्या स्किनकेअरमध्ये केला तर नक्कीच तुम्हाला जाणवत असलेल्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, टॅनिन आणि जीवनसत्त्वे चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात.

चहाचा फेस पॅक
चहाचा फेस पॅक बनवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावल्यास तुमची त्वचा निरोगी होते. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा वापरलेली चहा पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध घाला. हे मिश्रण मिक्स करून चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावा, हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. मधाचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेला हायड्रेट ठेवतात, तर चहामधील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा डिटॉक्सिफाय होते.

चहाचा स्क्रब
चहा पावडरपासून तुम्ही स्क्रब देखील बनवू शकता. हे स्क्रब क्लींजिंगसाठी प्रभावी ठरते. यासाठी १ चमचा चहा पावडर, १ चमचा दही आणि १ चमचा साखर मिसळा. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावत २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर धुवा. हे स्क्रब ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स काढून टाकण्यास मदत करते.

टॅन रिमूव्हर पॅक
जर तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग होत असेल तर २ चमचे चहा पावडर, १ चमचा बेसन आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हा पॅक तुमच्या चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंग आणि डाग कमी होतात, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि ताजी दिसते.

Comments are closed.