राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

अहिल्यानगरमध्ये राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी नेमका किती मुद्देमाल लंपास केला याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या संदर्भात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाणी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी आणि सह दिवाणी न्यायाधीश पंकज पाटील यांचे बंगले फोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. राहुरी न्यायालयाच्या पाठीमागे न्यायाधीशांच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था असून, त्यापैकी दोन बंगल्यांमध्ये ही चोरी झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथकास पाचारण करण्यात आले आहे. न्यायाधीशांचे बंगले फोडले जाणे हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. राहुरी तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळत असल्याचे चित्र आहे.

Comments are closed.