७ मिनिटांत ८५० कोटी रुपयांची चोरी, पॅरिसच्या लूव्र संग्रहालय प्रकरणात दोघांना अटक

पॅरिसच्या प्रसिद्ध लूव्र संग्रहालयातून १०२ मिलियन डॉलर्स म्हणजेच ८५० कोटी रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. शनिवारी रात्री फ्रेंच पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. दोघांचीही चौकशी सुरू आहे. पॅरिस पोलिसांनी अनेक संशयितांनाही ताब्यात घेतले आहे, परंतु त्यांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत.
स्थानिक फ्रेंच वृत्तपत्रानुसार, पहिला संशयित रात्री १० वाजताच्या सुमारास चार्ल्स डी गॉल विमानतळावर देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडण्यात आला. दुसऱ्या संशयिताला नंतर पॅरिसच्या उत्तरेकडील सीन-सेंट-डेनिस येथे अटक करण्यात आली.
दरम्यान, पॅरिससारख्या अत्यंत सुरक्षित शहराच्या मध्यभागी असलेल्या या संग्रहालयात केवळ ७ मिनिटांत चोरी पूर्ण करण्यात आली होती. चोर खिडकीतून आत आले, त्यांनी सुरक्षारक्षकांना धमकावून जागा रिकामी करून घेतली. त्यानंतर काचेच्या पेटीत ठेवलेले दुर्मिळ आणि मौल्यवान दागिने त्यांनी आपल्या पिशव्यांमध्ये भरले आणि पुन्हा खिडकीतून खाली ट्रकजवळ उतरले. पळण्यासाठी त्यांनी ट्रक न वापरता स्कूटरचा वापर केला, जेणेकरून अरुंद गल्ल्यांमधून लवकर पळता येईल आणि लपण्यासाठी जागा सापडेल. हे सगळे काम फक्त ७ मिनिटांत पूर्ण झाले.
हे सर्व दागिने 19व्या शतकातील आहेत. हे दागिने फ्रान्सच्या राजघराण्याचे आणि साम्राज्याचे प्रतीक मानले जातात. चोरांनी एकूण 8 मौल्यवान वस्तू चोरल्या असून त्यात राजघराण्याचा मुकुट, नेकलेस, कानातले आणि ब्रोच यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments are closed.