श्रेयसचा झेल पडला महागात, पुन्हा एकदा दुखापतीच्या सावलीत ‘कमनशिबी’ उपकर्णधार; किमान महिनाभर करावा लागणार आराम

हिंदुस्थानचा विजय गोड झाला, पण त्यात एक कडवट चव मिसळली गेली. कारण पुन्हा एकदा दुखापतीच्या चक्रात सापडला आहे टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर. ज्याने शनिवारी एक झेल टिपताना आपलं सर्वस्व झोकून दिलं, त्यालाच आता तीन आठवडय़ांसाठी मैदानाबाहेर बसावं लागणार आहे. जणू क्रिकेट देवता त्याच्या कष्टांकडे पाहतेय, पण पारितोषिकाऐवजी त्याची परीक्षाच घेतेय!

तिसऱया एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली होती. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर अॅलेक्स पॅरीचा झेल टिपताना श्रेयस आकाशात उडाला. झेल त्याच्या हातात सुरक्षित होता, पण त्याच क्षणी जमिनीने त्याला घट्ट पकडलं. कोसळताना त्याच्या डाव्या बरगडीला जबर धक्का बसला आणि काही क्षणांसाठी मैदानावरच सगळं थांबलं. नंतर तपासणीत समोर आलं की बरगडीला फ्रॅक्चर. आता त्याला किमान तीन आठवडय़ांची विश्रांती. म्हणजेच मैदानापासून पुन्हा एक अनिश्चित अंतर. श्रेयसचं हे दुखापतीचं प्रकरण म्हणजे एखाद्या कलाकाराच्या रंगमंचावरच्या प्रकाशासारखं. उजळतो, पण वारंवार विझतो. कधी पाठीचा त्रास, कधी खांद्याची जखम, आता बरगडी! जो आपल्या परिश्रमांनी कर्णधारपदाच्या दारापर्यंत पोहोचला त्यालाच वारंवार थांबावं लागतं. जणू नियती म्हणतेय, थांब थोडे, अजून कसोटी बाकी आहे!

तिसऱया सामन्यात हिंदुस्थानने विजय मिळवला. रोहित शर्माची नाबाद शतकी आणि विराट कोहलीची नाबाद अर्धशतकी खेळी ही त्याची शान ठरली. पण त्या आनंदावर श्रेयसच्या जखमेचं सावट पडलं. कारण ही दुखापत केवळ शरीराची नाही, तर मनाचीही आहे. श्रेयस आता मुंबईत प्राथमिक उपचार घेत आहे. त्यानंतर तो सेंटर ऑफ एक्सलन्स येथे जाणार असून पुढील चाचण्या तेथे होतील. बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते, त्याला आणखी विश्रांती लागू शकते. त्याचा दक्षिण आफ्रिका मालिकेतील (30 नोव्हेंबरपासून सुरू) सहभाग अनिश्चित झाला आहे. श्रेयसचं करियर म्हणजे जणू जेव्हा फॉर्मात येतो तेव्हाच नशिबाला काहीतरी आठवतं. त्याची खेळी, तंत्र, शांतता आणि संघातील उपस्थिती ही टीमसाठी अमूल्य आहेच, पण प्रत्येक वेळी कसली तरी दुखापत त्याला थांबवते.

Comments are closed.