संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा शिवसेनेचा आज निर्धार मेळावा, उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचाच असा संकल्प शिवसेनेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा उद्या वरळी येथील एनएससीआय डोममध्ये होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दिवाळी संपल्याने कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील अशा पद्धतीने निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. शिवसेनाही त्याच वेगाने पावले उचलत आहे. निवडणुकीच्या नियोजनाबाबत मुंबईतील विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांना या निर्धार मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून महत्त्वाच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या मतदार याद्या सदोष असल्याचे विरोधी पक्षांनी पुराव्यानिशी समोर आणले. याद्या दुरुस्त कराव्यात आणि नंतरच निवडणूक घ्यावी, असा आग्रह धरत विरोधक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यानंतरही निवडणूक आयोगाकडून याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी काहीच पावले उचलली गेलेली नाहीत. अशा परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, जनजागृती कशी करावी, मतदान केंद्रांवरील हालचालींवर कसे लक्ष ठेवावे, मतदारांना कोणत्या पद्धतीने सहकार्य करायचे याबाबत उद्धव ठाकरे या वेळी मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्याचा निर्धार
शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या टिझरला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या निर्धार मेळाव्यात मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्याचा निर्धार केला जाणार आहे. मुंबईचे भविष्य, भूमिपुत्रांचा उत्कर्ष यासाठी मुंबई जिंकायलाच हवी आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीने भगवा फडकवूया, असे आवाहन त्या माध्यमातून केले जाणार आहे.
विभागप्रमुख ते उपशाखाप्रमुखांची उपस्थिती
स्थळ : एनएससीआय डोम, वरळी
वेळ : सायंकाळी 5 वाजता

Comments are closed.