हरियाणातील 50 तरुणांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे
हातात बेड्या ठोकून पाठविले : सर्वाधिक युवक कैथल जिल्ह्यातील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत अवैध वास्तव्य करणाऱ्या हरियाणाच्या 50 युवकांना डिपोर्ट करत भारतात पाठविण्यात आले आहे. या सर्वांच्या हातात बेड्या आणि पायांमध्ये साखळदंड होते. या भारतीयांना आणणारे विमान दिल्ली विमानतळावर पोहोचले, तेथून हरियाणाच्या विविध जिल्ह्यांचे पोलीस या युवकांना स्वत:सोबत घेऊन गेले. हे सर्व युवक डंकी मार्गाने अमेरिकेत पोहोचले होते. यातील सर्वाधिक 14 युवक हे कैथल जिल्ह्यातील आहेत. याचबरोबर 3 नोव्हेंबर रोजी आणखी एक विमान डिपोर्ट करणाऱ्या भारतीयांसह अमेरिकेतून दाखल होणार आहे.
जे युवक डिपोर्ट होऊन आले आहेत, त्यांच्याकडे केवळ प्रत्येकी एक बॅग होती. या युवकांना अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांच्या शिबिरांमध्ये ठेवण्यात आले होते. बहुतांश युवक पनामाचे जंगल, निकारो, ग्वाटेमालामार्गे अमेरिकेत पोहोचले होते. काही युवक प्रथम छोट्या देशांमध्ये गेले आणि तेथून डंकी मार्गाने अमेरिकेत दाखल झाले होते. युवकांनी डंकी मार्गाने अमेरिकेत जाण्यासाठी 50-70 लाख रुपये खर्च केले होते. यातील कुणी जमीन विकली होती, तर कुणी कर्जाने रक्कम उभारली होती.
डिपोर्ट होऊन कैथल येथे परतलेल्या नरेश कुमारने गावातील स्वत:ची जवळपास एक एकर जमीन विकून 42 लाख रुपये आणि उर्वरित रक्कम कर्जाने उभारले होते. पैसे घेतल्यावर एजंटांनी अन्य सीमेद्वारे त्याला अमेरिकेत पाठविले आणि तेथे पोहोचताच अमेरिकेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते, तेव्हापासून तो तुरुंगातच होता. अमेरिकेच्या तुरुंग आणि शिबिरांमध्ये मोठ्या संख्येत भारतीय कैद आहेत. यातील अनेक जणांना आता भारतात आणले जाणार आहे.
Comments are closed.