वादळी वारे आणि पावसाचा मारा, खोल समुद्रात दोन मच्छीमार बोटी बुडाल्या; 12 खलाशी बचावले

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा मारा आणि वादळी वारे याच्या तडाख्याने उरणजवळील खोल समुद्रात आज दोन मच्छीमार बोटी बुडाल्या. मात्र अन्य बोटींवरील मच्छीमारांनी तातडीने धाव घेऊन १२ खलाशांचे प्राण वाचवले आहेत. हे सर्व जण सुखरूप परतले असून त्यांच्या कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान बोटी बुडाल्याने मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्रातील वातावरण बिघडले असून वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात हवामान खात्याने धोक्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे शनिवारपासून मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली होती. या इशाऱ्यानंतर मोरा तसेच करंजा बंदरामध्ये सुमारे ४०० मच्छीमार बोटी माघारी परतल्या. मात्र उशिरा धोक्याची सूचना मिळाल्याने खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी आता परतू लागल्या आहेत.

दोन महिन्यांत मासेमारी बंद होण्याची नववी घटना

कधी वादळी वारे तर कधी मुसळधार पाऊस यामुळे अनेकदा मासेमारी बंद करावी लागली. आतापर्यंत खराब हवामानाची शनिवारी सूचना देण्यात आल्याने आता नवव्यांदा पुन्हा मासेमारी बंद करावी लागली आहे. त्याचा फटका मच्छीमारांना बसला असून आज तर दोन बोटींना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मालकांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नाखवा यांनी केली आहे.

अशी केली सुटका

माघारी परतणाऱ्या काही बोटींपैकी कुलाबा येथील अंजनी शिनारे यांच्या मालकीची यशोदाकृष्णा ही बोट व वसई येथील अन्य एक मच्छीमार बोट वादळाच्या व पावसाच्या तडाख्यात सापडली. या वादळाशी सामना करण्यास बोटीवरील खलाशांना अपयश आले. काही खलाशांनी किनाऱ्याकडे जाणाऱ्या बोटींकडे मदतीची याचना केली. सुदैवाने हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने मच्छीमार बोटी तातडीने मदतीसाठी आल्या आणि ‘त्या’ दोन्ही बोटींवरील १२ खलाशांना आपल्या बोटींवर उतरवून त्यांची सुटका केली असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली. मात्र बुडालेल्या दोन्ही बोटींच्या मालकांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.

Comments are closed.