करूर चेंगराचेंगरी प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू
41 जणांचा झाला होता मृत्यू
मंडळे/करूर
तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात अभिनेता-राजकीय नेता विजयच्या रॅलीदरम्यान झालेल्या भयावह चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी आता सीबीआयने स्वत:च्या हातात घेतली आहे. या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला होता, तर 60 हून अधिक जण जखमी झाले होते. सीबीआयच्या विशेष पथकाने यापूर्वीच करूरच्या वेलुसामीपुरम येथील दुर्घटनास्थळाचा दौरा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांच्या एफआयआरला सीबीआयने पुन्हा नोंदविले आणि स्थानिक न्यायालयाला यासंबंधी माहिती दिली आहे.
हे प्रकरण तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके)च्या याचिकेवर सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयला सोपविण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीची जबाबदारी द्यावी आणि त्याच्या सहाय्याकरता अन्य अधिकाऱ्यांना नियुक्त करावे असा निर्देश न्यायालयाने सीबीआय संचालकाला दिला आहे. याचबरोबर न्यायालयाने माजी न्यायाधीश अजय रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय निरीक्षण समिती स्थापन केली असून ती सीबीआय चौकशीवर देखरेख ठेवणार आहे.
27 सप्टेंबर रोजी झालेली चेंगराचेंगरीची घटना नागरिकांचे जीवन आणि मूलभूत अधिकारांशी निगडित आहे, याचमुळे निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी अत्यंत आवश्यक आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये बेजबाबदार वक्तव्यं केली असल्याने जनतेच्या मनात निष्पक्ष चौकशीवरून संशय निर्माण होऊ शकतो. जनतेचा विश्वास न्यायव्यवस्थेवर कायम रहायला हवा आणि याची एकमात्र पद्धत निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करणे असल्याचे न्यायाधीश जे.के. महेश्वरी आणि एन.व्ही. अंजरिया यांच्या खंडपीठाने म्हटले होते.
चेंगराचेंगरी कशामुळे?
विजय यांच्या विशेष रॅली बसला निर्धारित स्थळापासून कमीतकमी 50 मीटरपूर्वी रोखण्यात यावे असे पोलीस अधिकाऱ्यांनी आयोजकांना सांगितले होते. परंतु 10 मिनिटांपर्यंत विजय बसमधून बाहेर न आल्याने लोकांची गर्दी अस्वस्थ झाली होती. लोक त्याला पाहण्यासाठी आतूर होते. यातून निर्माण झालेल्या चढाओढीतून चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.
अटींचे पालन न केल्याचा आरोप
या रॅलीसाठी टीव्हीकेने 10 हजार लोकांसाठी अनुमती मागितली होती. परंतु रॅलीत जवळपास 25 हजार लोक जमा झाले होते. पक्षाने पुरेसे पाणी, सुरक्षा आणि अन्य व्यवस्था केली नव्हती तसेच अनुमतीच्या अटींचे पालन केले नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. चेंगराचेंगरीतील पीडितांच्या परिवारांची भेट विजय आज घेणार आहे. पीडितांच्या परिवारांना चेन्नई येथे आणले गेले आहे.
Comments are closed.