छठपूजेच्या माध्यमातून एकतेचा संदेश

पंतप्रधानांची ‘मन की बात’ : ‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभागाचे आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा 127 वा भाग रविवार, 26 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. यादरम्यान त्यांनी छठ पूजेच्या माध्यमातून एकतेचा संदेश मिळत असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधानांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीबद्दल चर्चा केली.  सरदार पटेल हे आधुनिक काळातील देशातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वात अनेक गुण होते. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात होणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले.

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान प्रत्येक भागात वेगवेगळ्या विषयावर जनतेला संबोधित करतात. मागील भागात त्यांनी उत्सवादरम्यान जनतेला स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. या भागात पंतप्रधानांनी देशभरातील विविध विषयांवर भाष्य केले. मन की बातच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील अंबिकापूरमधील कचरा कॅफेचा उल्लेख केला. अंबिकापूरमध्ये कचरा कॅफे चालवला जात असून तिथे लोकांना प्लास्टिकच्या बदल्यात खायला दिले जाते. प्रत्येक एक किलो कचऱ्यासाठी एक जेवण आणि प्रत्येक अर्धा किलो कचऱ्यासाठी नाश्ता दिला जात असल्याचे आदर्श उदाहरण दिले.

वन विभागाने खारफुटींचे महत्त्व ओळखून गुजरातच्या किनारी भागात एक विशेष मोहीम सुरू केली आहे. पाच वर्षांपूर्वी वन विभागाच्या पथकांनी अहमदाबादजवळील धोलेरा येथे खारफुटीची लागवड सुरू केली होती. आज धोलेरा किनाऱ्यावर 3,500 हेक्टरवर खारफुटीची झाडे पसरल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ भाषणात भारतीय जातीच्या कुत्र्यांवरही चर्चा केली. पाच वर्षांपूर्वी त्यांनी देशवासीयांना आणि आपल्या सुरक्षा दलांना भारतीय जातीच्या कुत्र्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. हे श्वान आपल्या वातावरण आणि परिस्थितीशी अधिक सहजपणे जुळवून घेतात. गेल्यावर्षी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात देशी कुत्र्यांनी 8 किलो स्फोटके शोधून काढल्याने मोठा घातपात टळला होता. बीएसएफ आणि सीआरपीएफने त्यांच्या पथकांमध्ये भारतीय जातीच्या कुत्र्यांची संख्या वाढवल्याचेही मोदींनी सांगितले.

कोरापुट कॉफीची चव अद्भुत

पंतप्रधानांनी मन की बातमध्ये कॉफीवर चर्चा केली. त्यांनी कोरापुट कॉफीचा उल्लेख करत त्याची चव अद्भुत असल्याचे सांगितले. या कॉफीची केवळ चवच नाही तर कॉफीची लागवड लोकांनाही फायदेशीर ठरत आहे. कोरापुटमध्ये असे काही लोक आहेत जे त्यांच्या आवडीतून कॉफीची लागवड करत आहेत. भारताची कॉफी ही सर्वोत्तम कॉफी आहे. ती भारतात तयार केली जाते आणि जगाला आवडते. आता ईशान्य भारतातील कॉफी लागवडीचे क्षेत्रही वाढत असून भारतीय कॉफी जगभरात लोकप्रिय होत असल्याचे पंतप्रधान अभिमानाने म्हणाले.

Comments are closed.