महिला सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी खेळाडूंना दोष देण्याची प्रवृत्ती निंदनीय; मंत्र्यांचे विधान लाजिरवाणं, आदित्य ठाकरेंचा घणाघात

ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडूंसोबत इंदूरमध्ये घडलेल्या घाणेरड्या प्रकारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना भाजपचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी महिला क्रिकेटपटूंनाच दोष दिला. बाहेर पडण्यापूर्वी खेळाडूंना स्थानिक प्रशासन किंवा सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगायला हवे होते. हा आपल्यासाठी एक धडा असल्याचे विधान विजयवर्गीय यांनी केले. या विधानाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. महिला सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी खेळाडूंना दोष देण्याची प्रवृत्ती निंदनीय असून मंत्र्यांचे विधान लाजिरवाणे असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत केली.

मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटरसोबत लाजिरवाणा प्रकार घडला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी हा आपल्यासाठी धडा असल्याचे म्हटले आणि महिलांनी अधिक काळजी घेण्याचे विधान केले. हे विधान लाजिरवाणे असून सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. आपण ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्ससाठी तयारी करतो, जागतिक गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतोय, तिथेच सत्ताधारी नेत्यांची अशी मानसिकता अत्यंत लाजिरवाणी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महिला सुरक्षेचा प्रश्न देशात गंभीर होत असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्यांनाच दोष देण्याची प्रवृत्ती निंदनीय आहे. कोणत्याही महिलेसाठी, मग ती क्रिकेटपटू असो किंवा सामान्य नागरिक, शहरातील रस्त्यावर फिरणे गुन्हा आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच महिलांसोबत रोज घडणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याऐवजी मंत्री असे बेजबाबदार आणि असंवेदनशील करत असतील तर ते समाज आणि सरकारसाठीही कलंक आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या छेडछाड प्रकरणावर भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; खेळाडूंना दोष देत म्हणाले, “बाहेर पडण्याआधी…”

Comments are closed.