मोहम्मद शमीची पुनरागमनाची तयारी! रणजी ट्रॉफीदरम्यान खास व्यक्तीशी भेट

मोहम्मद शमी (Mohmmed Shami) शेवटचा भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याला कसोटी, टी-20 आणि वनडे संघात स्थान मिळालेलं नाही. काही काळापूर्वी टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर (Ajit Agarkar) यांनी सांगितलं होतं की, शमी पूर्णपणे फिट नाही, त्यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. पण याउलट शमीचं म्हणणं आहे की तो पूर्णपणे फिट आहे, म्हणूनच तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे.

दरम्यान, टीम इंडियाचे नवे सिलेक्टर आणि माजी भारतीय क्रिकेटपटू आर.पी. सिंग यांनी शमीची भेट घेतली आहे.

सध्या मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाकडून खेळत आहे. बंगालचा दुसरा सामना गुजरातविरुद्ध सुरू आहे. पहिल्या डावात शमीने गुजरातचे 3 फलंदाज बाद केले. आतापर्यंतच्या रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामातील केवळ 3 डावांमध्ये शमीने 10 बळी घेतले आहेत.

बंगाल विरुद्ध गुजरात सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार रोजी टीम इंडियाचे नवे सिलेक्टर आर.पी. सिंग ईडन गार्डन्स येथे उपस्थित होते. सामना संपल्यानंतर त्यांनी मोहम्मद शमीशी चर्चा केली. ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा अलीकडेच ‘शमी विरुद्ध आगरकर’ हा मुद्दा चर्चेत होता.

टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितले होते की, शमी पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. पण सध्या रणजी ट्रॉफीमध्ये शमी बंगालसाठी केवळ लांब स्पेल टाकत नाही, तर सतत विकेट्सही घेत आहे.

उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात शमीने दोन्ही डावांमध्ये मिळून 39.3 षटकांत 7 विकेट घेतल्या होत्या. आता गुजरातविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 18.3 षटकं टाकून 3 विकेट घेतल्या आहेत.

Comments are closed.