पश्चिम, मध्य रेल्वेने पालिकेची 500 कोटींची पाणीपट्टी थकवली! थकबाकी वसूल करण्यात पालिका प्रशासन असमर्थ

पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांत तब्बल 500 कोटी रुपयांचे पाणी बिल थकवले आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेचे तब्बल 328.07 कोटी रुपयांचे पाणी बिल भरलेले नाही, तर मध्य रेल्वे पाणी बिलाचे एकूण 172.10 कोटी रुपये मुंबई महापालिकेला देणे बाकी आहे. नागरिकांवर तत्काळ कारवाई करणारे पालिका प्रशासन पश्चिम व मध्य रेल्वेकडील थकबाकी वसूल करण्यात असमर्थ ठरले आहे.

मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वेला 201 पाणी कनेक्शन दिले आहेत. परंतु पश्चिम रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून त्याचे बिल भरलेले नाही. ते बिल सप्टेंबरमध्ये 328.07 कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. याचदरम्यान पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेकडूनच करापोटी 338 कोटी रुपये येणे असल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या अनेक पाईपलाईन पश्चिम रेल्वेच्या जमिनीतून जातात. जमीन रेल्वेच्या मालकीची असल्याने मुंबई महापालिकेने ‘राईट ऑफ वे’ किंवा ’लेव्ही चार्जेस’ म्हणून ओळखला जाणारा कर भरणे आवश्यक आहे. ही रक्कम 338 कोटी रुपये आहे. अशा प्रकारे पालिकेकडूनही  रक्कम येणे बाकी असल्याने दोन्ही यंत्रणांनी बैठकीतून तोडगा काढला पाहिजे, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे, मध्य रेल्वेने सप्टेंबरपर्यंत पालिकेचे 172.10 कोटी देणे बाकी आहे. पालिकेने मध्य रेल्वेला 182 कनेक्शन दिली आहेत. त्यावर पाणी बिलाची थकीत रक्कम केवळ 44.44 कोटी रुपये असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. पालिकेने मध्य रेल्वेला ‘राईट ऑफ वे’ शुल्काअंतर्गत एकूण 137.47 कोटी देणे बाकी असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त पादचारी पूल किंवा रोड ओव्हरब्रिजला जागा देण्यासाठी रेल्वे पालिकेकडून शुल्क आकारते. त्याचे 260.59 कोटी रुपये पालिकेकडून येणे बाकी असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

पालिकेकडून फक्त नोटिसा

रेल्वे ही एक सरकारी यंत्रणा आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे वीज किंवा पाणी कनेक्शन तोडू शकत नाही. पालिका फक्त नोटिसा जारी करू शकते. थकीत रकमेचा गुंता दोन्ही यंत्रणांतील बैठकीतून सामोपचारानेच सुटला जाईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पश्चिम रेल्वेनेही थकीत पाणी बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेला दोनदा पत्रे लिहिली. त्यावर पालिकेकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

Comments are closed.