मार दो हातोडा! अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी हिंदुस्थानी महिला सज्ज, आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ‘खेळ खल्लास’ करणार; महिला क्रिकेटला नवे जगज्जेते लाभणार

आठ वर्षांपूर्वी जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचाच पराभव करून हिंदुस्थानी महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. आता पुन्हा एकदा त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती करत आपल्या पहिल्या जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने धावत असलेला हरमनप्रीत कौरचा संघ उपांत्य फेरी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. एकीकडे बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास करून जगज्जेतेपदापासून दोन पावले दूर असलेल्या हिंदुस्थानी महिलांकडून 140 कोटी हिंदुस्थानी चाहत्यांची एकच इच्छा आहे, मार दो हातोडा आणि काबीज करा पहिले जगज्जेतेपद.

सात वेळा विश्वविजेतेपद पटकावलेला

ऑस्ट्रेलियन संघ म्हणजे महिला क्रिकेटमधील त्सुनामी. या स्पर्धेतील अपराजित संघ असा तोरा मिरवणाऱया ऑस्ट्रेलियन महिलांना पहिला आणि शेवटचा धक्का देण्यासाठी हिंदुस्थानी रणरागिणींनी कंबर कसलीय. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ हा जोश प्रत्येकीत दिसतोय. आव्हान खडतर असले तरी अशक्य असे काही नाही. त्यामुळे डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारी 45 हजारांचा निळा समुद्र ‘भारत माता की जय’ च्या लाटांमध्ये उसळेल आणि हिंदुस्थानी महिलांना अंतिम फेरीचा किनारा गाठून देईल.

11 खेळाडू नव्हे, 1.4 अब्ज लोकांचा आवाज

‘हिंदुस्थानी संघाविरुद्ध सामना म्हणजे फक्त अकरा खेळाडूंविरुद्ध खेळायचं असं नाही, त्यांच्यामागे 1.4 अब्ज लोकांचा आवाज असतो,’ असं ऑस्ट्रेलियाची फिरकीवीर अलाना किंग म्हणाली.

पण तिने लगेच मिश्कील हसत जोडले, ‘आम्हीही तयार आहोत! स्टेडियम समुद्र असो वा वाळवंट, आमच्या बॅट आणि बॉलवर आमचा विश्वास आहे! ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास बलाढय़ आहे. कारण त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 76/7 वरून सामना फिरवला, हिंदुस्थानने 330 धावांचा पर्वत उभा केला तरी त्यावर चढून गेले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अलाना किंगने तर इतिहास घडवला. 18 धावांत 7 विकेट गारद करत विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजी. तरीही ऑस्ट्रेलियाला थोडी काळजी आहे. कर्णधार एलिसा हिली संघात नसल्यामुळे ऑस्ट्रेलिया काहीशी मागे पडलीय.

जिंकण्याचेच ध्येय

सुरुवातीला तीन सलग पराभव पण हिंदुस्थानी महिला नाउमेद झाल्या नाहीत. त्यांनी स्वतःचा खेळच नव्याने लिहिला आणि शेवटच्या सामन्यात आपलं उपांत्य तिकीट पक्कं केलं. स्मृती मानधनाने तर संपूर्ण स्पर्धेचा रन चार्ट ताब्यात घेतला. 7 डावांत 365 धावा. म्हणजे तिच्या बॅटमधून निघणाऱ्या आवाजातसुद्धा संगीत आहे. उद्याही तिच्या बॅटमधून शतकी सूर अपेक्षित आहे. मात्र प्रतीका रावल दुखापतीमुळे बाहेर गेली आहे आणि तिच्या जागी पुन्हा शेफाली वर्मा परतलीय. 2017 साली आम्ही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता आणि इंग्लंडसमोर अंतिम फेरी गमावली. यंदा इतिहास उलटवायचा आहे,’ असे कप्तान हरमनप्रीत कौर ठामपणे म्हणाली.

तिसऱयांदा गाठणार अंतिम फेरी

अद्याप एकदाही आपण जग जिंकलं नाहीय. 2005 आणि 2017 या दोन स्पर्धांची अंतिम फेरी आपण गाठलीय. आता त्याची पुनरावृत्ती तर करणारच, पण प्रथमच अंतिम फेरी जिंकण्याचा इतिहासही करणार. घरच्या मैदानात हा इतिहास रचणे महिला क्रिकेटसाठी सर्वोच्च अभिमानाचा आणि पराक्रमाचा क्षण असेल. सातवेळा जगज्जेते ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचे आठव्या जगज्जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त करूनच हिंदुस्थानी महिलांना आपल्या जेतेपदाचे स्वप्न साकार करावे लागणार आहे.

Comments are closed.