चक्रीवादळ 'मोंथा' आंध्र, तामिळनाडूला धडकले
अनेक विमानोड्डाणे, रेल्वेगाड्या रद्द : मुसळधार पावसाचा इशारा जारी : चक्रीवादळाची ओडिशा, प. बंगालकडे वाटचाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, हैदराबाद
बंगालच्या उपसागरात उद्भवलेले ‘मोंथा’ हे तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशात काकीनाडा आणि मछलीपट्टणम् दरम्यान धडकल्यामुळे किनारी भागात शेकडो घरे आणि झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हवाई आणि रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत. हे चक्रीवादळ आता उत्तरेकडे आणि वायव्येकडे सरकत आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. लँडफॉलच्या वेळी चक्रीवादळ ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने वाहत असल्यामुळे रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच मदत व बचाव मोहीम राबविण्यासाठी सर्व राज्य सरकारे हाय अलर्टवर आहेत.
आंध्र प्रदेशला वादळाचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. मोंथा चक्रीवादळाच्या लँडफॉलनंतर हवामान खात्याने पश्चिम बंगालच्या विविध जिह्यांमध्ये हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार, पूर्व मिदनापूर जिह्यात सर्वात जास्त पाऊस पडणे सुरू आहे. पावसाच्या अंदाजामुळे पूर्व मिदनापूर जिह्यातील दिघा येथे कोणत्याही पर्यटकांना समुद्रात जाण्याची परवानगी नाही. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये पूर्वीपासूनच सतर्कता जारी केल्याने लोक सावध स्थितीत दिसून आले.
ओडिशामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि ओडीआरएएफच्या 140 बचाव पथकांसह 5,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. नऊ जिह्यांमधील शाळा आणि अंगणवाड्या 30 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालसाठीही मोंथा चक्रीवादळाचा धोका निर्माण होऊ शकतो. 24 परगणा, मेदिनीपूर आणि बीरभूमसह अनेक जिह्यांमध्ये डोंगराळ भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने 31 ऑक्टोबरपर्यंत दार्जिलिंग, कालिम्पोंग, अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
52 विमाने, 120 रेल्वेगाड्या रद्द
चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी आंध्र सरकारने 22 जिह्यांमध्ये 3,174 निवारा गृहे उभारली आहेत, तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, विजयवाडा आणि तिरुपती विमानतळांवरून 52 विमाने रद्द करण्यात आली आहेत. दक्षिण मध्य रेल्वे झोनच्या एकूण 120 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफने 25 पथके तैनात केली असून 20 पथके मंगळवारपासूनच सतर्क आहेत.
आंध्र प्रदेशात प्रचंड विनाश
मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे होत आहेत. आंध्र प्रदेश वादळाचा सर्वाधिक फटका सहन करत आहे. चक्रीवादळ आंध्र किनाऱ्यावर धडकले तेव्हा त्याचा वेग ताशी 110 किलोमीटर होता. या काळात मार्गात येणाऱ्या अनेक वस्तू उडून गेल्या. तसेच झाडे उन्मळून पडली आणि घरांचीही पडझड झाली आहे.

ताशी 90-100 किमी वेगाने वारे
मोंथा चक्रीवादळ आता उत्तरेकडे आणि वायव्येकडे सरकत असल्याने आंध्र प्रदेश ते ओडिशापर्यंत सर्वजण सतर्क आहेत. 90 ते 100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. लोक आपली घरे सोडून आश्रयस्थानांमध्ये जात आहेत. अनेक बचाव पथके तैनात आहेत.
महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार
चक्रीवादळ मोंथामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदलल्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने बुधवारपाठोपाठ गुरुवारीही अनेक भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात 60-70 किमी/ताशी वेगाने वारेही वाहतील. झारखंड आणि बिहारमध्येही दमदार पाऊस बरसणार आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये ढगाळ आकाश आणि तापमानात घट झाल्यामुळे थंडीत हळूहळू वाढ होत आहे.

उत्तर प्रदेश, अरुणाचलही चक्रीवादळाच्या कवेत
अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पूर्व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 तारखेला पश्चिम उत्तर प्रदेशात विजांसह गडगडाट आणि जोरदार वारे (ताशी 30-40 किमी वेगाने) येण्याची शक्यता आहे. पुढील 5-7 दिवस या प्रदेशातील तापमानात कोणताही बदल होणार नाही. पावसाचा मारा सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश, ओडिशात रेड अलर्ट
विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ली, काकीनाडा, यानम, डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा आणि पश्चिम गोदावरीसह आंध्र प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. हा रेड अलर्ट 30 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. ओडिशातील मलकानगिरी, कोरापूट, रायगड, गजपती आणि गंजम जिह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आसपासच्या जिह्यांसाठी आयएमडीने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत.
तामिळनाडूमध्ये ऑरेंज अलर्ट
तामिळनाडूमधील चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, रानीपेट, तिरुवल्लूर, तिरुवन्नमलई आणि विल्लुपुरम जिह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळ आत सरकत असताना या भागात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेलंगणातील जयशंकर भूपालपल्ली, मुलुगु, भद्राद्री कोठागुडेम आणि महाबुबाबाद जिह्यांसाठी आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. गुजरातच्या अनेक भागातही अवकाळी मुसळधार पाऊस सुरूच आहे. आयएमडीने 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात व्यापक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Comments are closed.