काँग्रेसच्या कार्यक्रमात बांगलादेशचे राष्ट्रगीत गायन

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यक्रमात बांगलादेशच्या राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले आहे. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विधु भूषण दास यांनी एका बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत अमार सोनार बांग्ला, आमी तोमाय भालोबाशी गायले आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात बांगलादेशी राष्ट्रगीत गायन झाल्याने भाजपने संतप्त होत काँग्रेसला ‘बांगलादेशी प्रेमी’ ठरविले आहे.

श्रीभूमी जिल्ह्यातील इंदिरा भवनमध्ये काँग्रेसच्या जिल्हा सेवा दलाच्या कार्यकारिणी समितीची बैठक झाली. यादरम्यान काँग्रेस नेते दास यांनी स्वत:च्या भाषणाच्या प्रारंभी बांगलादेशचे राष्ट्रगीत गायले आहे. संकेत याहून अधिक जोरदार असू शकत नाहीत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशने पूर्ण ईशान्येला गिळकृंत करणारा एक नकाशा प्रकाशित करण्याची आगळीक केली होती आणि आता बांगलादेशीप्रेमी काँग्रेस आसाममध्ये बांगलादेशचे राष्ट्रगीत गात आहे. जर यानंतरही कुणाला अजेंडा समजत नसेल तर तो एक तर अंध आहे किंवा काँग्रेसला सामील आहे अशी टीका भाजपने केली आहे.

ईशान्येला भारतापासून तोडू पाहणाऱ्या बांगलादेशचे राष्ट्रगीत काँग्रेस नेता गातोय. यातून काँग्रेसने दशकांपर्यंत आसामध्ये अवैध घुसखोरीची अनुमती का दिली हे स्पष्ट होते. मतपेढीच्या राजकारणासाठी काँग्रेसने राज्याचे लोकसंख्येचे स्वरुप बदलून ‘ग्रेटर बांगलादेश’ निर्माण करण्याचा डाव रचला असल्याचा आरोप आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी केला आहे.

 

Comments are closed.