कसाऱ्याचा फणसपाडा गॅस्ट्रोच्या विळख्यातः चिमुकलीचा मृत्यू, ३३ जणांना लागण

कसारा परिसरातील फणसपाडा गाव गॅस्ट्रोच्या विळख्यात सापडले आले असून या साथीच्या रोगाने एका चार वर्षीय चिमुकलीचा बळी घेतला आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर दूषित झाली आहे, नळालाही अशुद्ध पाणी येत आहे. त्यामुळे गावातील सुमारे ३३ ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. अत्यवस्थ असलेल्या दोघांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य रुग्णांवर कसारा आणि खडर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फणसपाडा परिसरातील ग्रामस्थांना गेल्या दोन दिवसांपासून उलटी अतिसाराचा त्रास होत असल्याने ते खासगी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कसारा, खर्डी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. उपचार सुरू असताना वेदिका भस्मा (४) या मुलीचा मृत्यू झाला. तिला गॅस्ट्रोची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात एकच घबराट पसरली, तर आरोग्य यंत्रणेची एकच पळापळ उडाली. या भागातील अत्यवस्थ असलेल्या दोन रुग्णांना शहापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुमारे सहाहून अधिक रुग्णांवर खर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून २० हून अधिक रुग्णांना वैद्यकीय कॅम्प फणसपाडा येथे दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया म्हात्रे, डॉ. आशू शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक या भागात काम करत आहे.

संशयित रुग्णाचा मृत्यू
आम्ही दोन दिवसांपासून गावात सर्व्हे करीत आहोत. आरोग्य अधिकाऱ्यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली आहे. एक गॅस्ट्रो संशयित रुग्ण दगावला आहे. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तालुका आरोग्य विभाग यावर योग्य त्या उपाययोजना करत असून आमचे एक पथक पाड्यात कार्यरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन शहापूरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे यांनी केले आहे.

अनेक वर्षांपासून या पाड्यात पिण्याच्या शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन योजनेचे काम हाती घेतले होते. मात्र अद्याप त्या कामाचा श्री गणेशा न झाल्याने ग्रामस्थांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

पाऊस, अस्वच्छता, उताराच्या मार्गाने वाहत जाणारे नाल्याचे पाणी हे विहिरीत जात असल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. त्यातूनच ही साथ पसरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या पाड्यातील लोकांना विहिरीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने विहिरीतील पाणी जेवणासाठी, अंघोळीसाठी व पिण्यासाठी वापरले जात आहे.

पाणी योजनेच्या नळाना पाच दिवसांनी अशुद्ध पाणी येत असल्यामुळे या पाण्याचा ग्रामस्थ वापर करत नाहीत. अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Comments are closed.