परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच

सप्टेंबर महिन्यात पावसाने दाखविलेली अवकृपा आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही कायम ठेवली आहे. सततच्या पावसाने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळा हंगाम संपला तरी सतत पाच दिवस पाऊस पडत असल्याने काहींनी कापून ठेवलेले भातशेती वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस पाठ सोडायला तयार नसल्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे मातीमोल झाले आहे. यात पावटा,कुळीथ,तुर या प्रमुख पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके कुजून गेली आहेत. काढणी करून ठेवलेली शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, ऑक्टोबर संपत आला तरी, पावसाचे संकट थांबण्याचे नाव घेत नसून पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले आहे. वायंगणी शेती पाण्यावर तरंगत आहे. भात पिकांची प्रचंड नुकसान झाले असून पिके वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. ही भरपाई कधी मिळणार याची शाश्वती नाही. त्यामुळे आता तरी पावसा थांब रे बाबा, बस झाले, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Comments are closed.