Alcohol Facts : शांत बसणारा माणूस पण पोपटा सारखा बडबडायला लागतो, दारूत असं असतं तरी काय?
आपण सगळ्यांनी कधी ना कधी पाहिलं असेल दारू प्यायल्यानंतर काही लोक अगदी बदलून जातात. जो नेहमी शांत असतो, तो अचानक मोठ्याने बोलतो, विनोद करतो किंवा काही वेळा भांडायलाही तयार होतो. अगदी भित्रा माणूसही वाघासारखा वागू लागतो. पण असा काय जादूई बदल होतो शरीरात की व्यक्तीचं वर्तन पूर्ण बदलतं? चला जाणून घेऊया दारूच्या या “केमिकल कॉन्फिडन्स” मागचं विज्ञान.
मेंदूतील रसायनांचा खेळ
दारू शरीरात गेल्यानंतर ती थेट मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर म्हणजेच संदेशवाहक रसायनांवर परिणाम करते. यातील सर्वात महत्त्वाचं रसायन आहे GABA (Gamma-Aminobutyric Acid). दारू हे रसायन सक्रिय करतं आणि मेंदूची कार्यक्षमता मंदावते. त्यामुळे व्यक्तीला आराम मिळतो, ताण कमी होतो आणि एक खोटी “सेफ्टी”ची भावना निर्माण होते.
म्हणूनच अनेक लोक म्हणतात, “एक प्याल्यावर सगळ्या चिंता नाहीशा होतात!”
दारू फक्त GABA वरच नाही, तर मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवरही परिणाम करते हाच तो भाग जो आपल्या विचारांना, निर्णयांना आणि वर्तनावर नियंत्रण ठेवतो. दारू पिल्यानंतर हे नियंत्रण कमी होतं आणि त्यामुळे लोक मोकळेपणाने बोलतात, मोठ्याने हसतात, आणि कधीकधी असं काही सांगतात जे ते शुद्धीत कधीही बोलले नसते.
त्याच वेळी डोपामाइन नावाचं “हॅप्पी हार्मोन” वाढतं, जे व्यक्तीला आनंदी, आत्मविश्वासू आणि धाडसी बनवतं.
त्या क्षणी त्यांना वाटतं “मी काहीही करू शकतो!” पण हा आत्मविश्वास कायमस्वरूपी नसतो. दारूचा परिणाम उतरल्यावर मेंदू पुन्हा आपल्या मूळ स्थितीत परततो. डोपामाइन कमी होतं, GABA सामान्य होतं आणि व्यक्तीला उमगतं. दारूच्या नशेत जो “शेर” बनला होता, तो प्रत्यक्षात रसायनांच्या खेळाचा परिणाम होता.
दारू आरोग्यासाठी हानिकारक
दारू तात्पुरता आत्मविश्वास आणि आनंद देते, पण दीर्घकाळ वापरल्यास शरीरावर, मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच दारूला “कॉन्फिडन्स ड्रिंक” समजणं चुकीचं आहे. खरा आत्मविश्वास आपल्या विचारांतून आणि कृतीतून निर्माण होतो, दारूच्या ग्लासातून नव्हे.
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. दारू आरोग्यासाठी वाईट आहे. दारूचं समर्थन किंवा त्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश My Mahanagar Live चा नाही.)
 
			 
											
Comments are closed.