पवईत भरदिवसा 17 मुले ओलीस, अमेरिकी गुन्हेगारीच्या पॅटर्नमुळे मुंबईत घबराट, पोलीस अधिकारी अमोल वाघमारे यांनी अचूक वेध घेत किडनॅपर रोहित आर्याला ठोकले…चार तासांच्या ओलीसनाट्यानंतर सुटकेचा निःश्वास

पवईत भरदिवसा एका स्टुडिओत अभिनयाचे ऑडिशन देण्यासाठी आलेल्या 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याच्या घटनेने आज मुंबई हादरली. चार तासांच्या ओलीसनाटय़ानंतर पोलिसांच्या पथकाने बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश केला. पोलीस अधिकारी अमोल वाघमारे यांनी अचूक वेध घेत किडनॅपर रोहित आर्या याला ठोकले आणि सगळय़ांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. अमेरिकी गुन्हेगारीच्या पॅटर्ननुसार घडलेल्या या घटनेने महाराष्ट्राच्या राजधानीत घबराट पसरली असून कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पवईच्या साकीविहार मार्गावरील महावीर क्लासिक इमारतीतील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने 17 विद्यार्थ्यांसह एक महिला आणि वृद्धाला ओलीस ठेवल्याची माहिती दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पवई पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सोबत अग्निशमन दलाचे जवानदेखील पोहचले.

पोलिसांनी रोहित आर्या याच्याशी संपर्क साधून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तुझे म्हणणे सांग पण मुलांना सोडून दे, अशी विनंती पोलिसांनी केली, पण रोहित पोलिसांचे म्हणणे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे पोलिसांचे दुसरे पथक बाथरूमच्या खिडकीतून आत घुसले. पोलीस आत आल्याचे लक्षात येताच रोहित गडबडला. त्याने त्याच्याकडील एअरगनने पोलिसांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत रोहित जखमी झाला. पोलिसांनी लगेच सर्व मुलांसह महिला व वृद्धाला सुखरूप बाहेर काढले. रोहितला ताब्यात घेऊन नजीकच्या इस्पितळात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

वेबसीरिजसाठी ऑडिशनचा बहाणा

वेबसीरिजकरिता मुलांची आवश्यकता आहे त्यासाठी ऑडिशन घेत असल्याचे रोहितने मुलांच्या पालकांना सांगितले होते. त्यानुसार राज्यभरातून मुले आली होती. 17 मुले ऑडिशनसाठी गेल्या चार दिवसांपासून तेथे जात होते. दुपारी जेवणासाठी मुलांना सोडले जायचे, परंतु आज तसे झाले नाही. रोहितने कोणालाच दुपारी जेवणासाठी जाऊ दिले नाही. तेव्हा पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. त्यांनी विचारपूस सुरू केली, पण उत्तर मिळाले नाही. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. दरम्यान, मुलांना ओलीस ठेवले असल्याचा व्हिडीओ रोहितने व्हायरल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे दाखल झाला. मुलांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण इमारतीला वेढा घातला होता.

रोहित आर्या हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता. तो चेंबूर येथे राहत होता. रोहितचे सोशल मीडियावर एक खाते आहे-. त्याने कचऱयाबाबत निष्काळजीमुक्त महाराष्ट्र असे इन्स्टाग्रामवर पेज सुरू केले होते. त्यावर स्वच्छता मॉनिटर नावाने सिंधुदुर्ग येथील एका शाळेतील मुलाचा व्हिडीओदेखील शेअर केला होता. रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवरून स्वच्छता मॉनिटरबाबत विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.

अमोल वाघमारे यांच्या गोळीने घेतला अचूक वेध

रोहित पोलिसांचे ऐकण्यास राजी नव्हता. त्यामुळे वेळ जसा सरकत होता तसे सर्वांचे टेन्शन वाढत होते. रोहित कुठलेही पाऊल उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी भीती होती. त्याच्याजवळ घातक केमिकल होते. त्यामुळे सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. अखेर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शक्कल लढवली. एका बाजूने पोलिसांनी रोहितला बोलण्यात गुंतवून ठेवले, तर दुसऱया बाजूने एक पथक बाथरूमच्या खिडकीतून हॉलमध्ये घुसले. पोलिसांना समोर बघून रोहित बिथरला. गडबडलेल्या रोहितने मुलांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कोणालाही इजा करण्यापूर्वी पोलिसांनी ठोस पाऊल उचलले. रोहितच्या हातात एअरगन होती. त्यातून तो मुलांवर हल्ला करेल किंवा त्याच्याकडे असलेल्या घातक रसायनाच्या सहाय्याने तेथे आग लावेल असे वाटताच पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी बंदुकीतून गोळी झाडून रोहितच्या छातीचा वेध घेतला. गोळी लागताच रोहित खाली कोसळला आणि त्याने चार तास केलेल्या ओलीसनाटय़ाचा अंत झाला.

फिल्मीस्टाईल विद्यार्थ्यांची सुटका

पवई पोलिसांसह क्यूआरटी, विशेष पथक घटनास्थळी धडकले होते. अपहरणकर्ता शरण येत नसल्याने पोलिसांनी शक्कल लढवली. त्याला फोनवर बोलण्यात गुंतवून पोलीस दुसऱया बाजूने बाथरूमच्या खिडकीवाटे आतमध्ये शिरले. त्यावेळी रोहितने ओलीस ठेवलेल्या मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एअरगन पोलिसांवर रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी स्वरक्षणासाठी रोहितवर गोळी झाडली. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्यभरातून बोलावले मुलांना

रोहित आर्याने ऑडिशनसाठी मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली येथून मुलांना बोलावले होते. अंतिम ऑडिशन असल्याचे मुलाच्या पालकांना सांगण्यात आले होते. आर्याने ऑडिशनसाठी कुठे जाहिरात प्रकशित केली होती, याची पोलीस माहिती गोळा करत होते.

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुठेय?

गेल्या काही दिवसांतील घटना

9 एप्रिल : मुंब्रा येथे 10 वर्षीय मुलीवर अत्याचार हत्या  5 जुलै : भिवंडीतील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार  23 ऑक्टोबर : साताऱयातील फलटण एका महिला डॉक्टरने पोलीस कर्मचाऱयावर बलात्कार, छळाचे आरोप करीत आत्महत्या केली.   23 ऑक्टोबर : काळाचौकी परिसरात प्रेम प्रकरणातील वादातून मनीषा यादव नावाच्या तरुणीवर सोनू बराय याने जीवघेणा चाकूहल्ला करून स्वतःवर वार करून जीवन संपवले.  27 ऑक्टोबर : भिवंडी येथील गणेशपुरी भागात एका 65 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.  29 ऑक्टोबर : भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून हत्या. गणेशपुरी पोलीस ठाण्यातील घटना.

गुन्हे शाखा करणार चौकशी

या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांना ज्वलनशील रसायन फवारल्याचे दिसले. तिथे आग लावण्याचा त्याचा हेतू होता, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलीस आता आर्याच्या कुटुंबीयाची माहिती गोळा करत आहेत. काहीजणांचे जबाबही नोंदवले आहेत. दरम्यान, मुलांना सोडून दे असे सांगूनही अपहरणकर्ता ऐकत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आत घुसून कारवाई केली आणि सर्वांची सुखरूप सुटका केली. त्यात अपहरणकर्त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी एअरगन आणि केमिकल सापडले आह, असे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

मला जे त्रास देताहेत त्यांना जबाबदार धरा!

आत्महत्या करण्याऐवजी मी प्लॅन केला आणि काही मुलांना ओलीस ठेवले. माझ्या काही मोठय़ा मागण्या नाहीत. माझे काही प्रश्न आहेत. मला काही लोकांशी बोलायचे असून त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. मला उत्तर हवे आहे. ना मी दहशतवादी आहे, ना माझी पैशांची मागणी आहे. तुम्ही काही चुकीचे पाऊल उचलले तर मी या जागेला आग लावून टाकेन.  याला जबाबदार त्यांना धरले जावे जे गरज नसताना मला त्रास देत आहेत.  मी एकटा नाही. अन्य लोकंदेखील आहेत. मला जो त्रास होतोय तोच अनेकांना होतोय. त्यावर मी उपाय सुचवू इच्छितोय, असा व्हिडीओ रोहित आर्या याने मुलांना ओलीस ठेवल्यानंतर व्हायरल केला होता.

शिंदे सरकारच्या काळापासून रोहित आर्याचे दोन कोटींचे बिल थकलेले मृत्यूचे रहस्य काय?

तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा संबंध काय?

शिंदे सरकारच्या काळात दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री असताना या विभागात झालेल्या गडबडीचे, अनागोंदीचे, अनियमिततेचे पुरावे रोहित आर्याकडे होते, अशी चर्चा आहे. त्याने सातत्याने त्याविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे या ओलीसनाटय़ाचे मूळ काय, असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात असून पोलीस कारवाईत झालेल्या रोहितच्या मृत्यूचे रहस्य नेमके काय, असा प्रश्नही नेटकरी विचारत आहेत.

सप्टेंबर 2022 मध्ये रोहित आर्याने शाळांसाठी ‘स्वच्छता मॉनिटर’ हा प्रकल्प डिझाईन केला होता. ‘माझी शाळा, सुंदर शाळा’  प्रकल्पाचेही डिझाईन त्याचे होते. या कामांचे दोन कोटी रुपयांचे बिल सरकारने थकवल्याचा त्याचा आरोप होता. त्यासाठी 2024 मध्ये त्याने दोनवेळा उपोषण केले होते. त्याचवेळी केसरकर यांच्याकडील सरकारी रामटेक बंगल्याबाहेरही त्याने आंदोलन केले होते. मुंबई मराठी पत्रकार संघात त्याने पत्रकार परिषद घेऊन शिक्षण खात्यावर आरोप केले होते. आजच्या घटनेनंतर अनेक बाबी पुढे येत असून रोहितचे आरोप केसरकर आणि शालेय शिक्षण विभागाने फेटाळले आहेत.

Comments are closed.