‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, स्थगितीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराज ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे जी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची मक्तेदारी असू शकत नाही, असे सुनावत न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.
2009 साली महेश मांजरेकर यांच्या अश्वमी फिल्म्ससोबत ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाची सहनिर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने आधीच्या चित्रपटाच्या शीर्षक आणि पटकथेवर विशेष कॉपीराईट असल्याचा दावा केला होता. 2013 साली कंपनीने चित्रपटाचे पूर्ण हक्क मिळवले आणि नंतर महेश मांजरेकर हे त्याचा सिक्वेल काढणार असल्याचे दिसून आले. कंपनीने आरोप केला आहे की, ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ चित्रपटासाठी पटकथा, कथानकाची रचना आणि संवादांचे बरेच भाग कॉपी केले आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्यासमोर सुनावणी झाली.
 
			 
											
Comments are closed.