मुख्यमंत्र्यांचे पुन्हा आश्वासन… 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा आज निर्णय

माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले. येत्या 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या आश्वासनावर शेतकरी नेते समाधानी झाले आहेत.  शेतकरी आंदोलनावर ते उद्या निर्णय घेणार आहेत.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा ‘महाएल्गार ट्रक्टर मोर्चा’ सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज  आंदोलकांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले होते. सह्याद्री अतिथीगृहात रात्री 8 ते 10.30 अशी दीर्घकाळ ही बैठक चालली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे निकष काय असावेत आणि भविष्यात शेतकऱ्यांची थकबाकी राहणार नाही याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवडय़ात कर्जमाफी कशी करावी, याबाबतचा अहवाल सादर करेल. त्यानंतर 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला जाईल.

कर्जवसुली जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे याबाबत जूनपूर्वी निर्णय घेऊ. आर्थिक अडचणी आहेत हे जरी खरे असले तरी आम्ही अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंतची सगळय़ात मोठी मदत केलेली आहे. त्यामुळे याबाबतीतही काहीतरी चांगले करू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

बच्चू कडूंच्या मागण्या

कोणत्याही अटी-शर्तीशिवाय शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.

वेळेवर कर्जफेड करणाऱया शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रति टन 4 हजार 300 रुपये एफआरपी द्यावी.

कांद्याला किमान प्रति किलो 40 रुपये दर मिळावा.

कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य आणि निर्यात कर कायमस्वरूपी रद्द
करावा.

गायीच्या दुधाला किमान 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 65 रुपये दर जाहीर करावा.

निर्णयाबाबत समाधानी बच्चू कडू

या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले, ‘आम्ही या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीबाबत तारीख घेण्यासाठी आलो होतो, ती आज मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 30 जून 2026 आधी कर्जमाफी करण्याचा शब्द दिलेला आहे. त्यामुळे याबाबतीत तरी आम्ही समाधानी आहोत. ते शब्द पूर्ण करतील, अशी खात्री आहे.’

Comments are closed.