हिंदुस्थानी महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत; स्पर्धेत अपराजित जगज्जेत्या ऑस्ट्रेलियावर हातोडा प्रहार, जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकी खेळीने इतिहास रचला

‘मार दो हातोडा’ म्हणत हिंदुस्थानच्या रणरागिणी डी. वाय. पाटील स्टेडियमवर उतरल्या आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. मुंबईचे बदललेले हवामान पाहता आज पावसाचे संकट कायम होते, पण आज स्टेडियमवर असा गडगडाट झाला की, ऑस्ट्रेलियन हवेतले ढगच गप्प झाले. ते बरसणे ही विसरले. सलग 15 सामने अपराजित असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला सिंहिणी हिंदुस्थानच्या रणरागिणींसमोर आज अक्षरशः मांजर झाल्या. हिंदुस्थानी महिला संघाने अगदी जगज्जेतेपदाच्या थाटात महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत आठ वर्षांनंतर पाऊल टाकले. आता गेल्या वर्षी रोहित शर्माच्या हिंदुस्थानी संघाने जे करून दाखवले होते त्या जगज्जेतेपदाच्या पुनरावृत्ती हरमनप्रीत काwरच्या संघाला 2 नोव्हेंबरला करायची आहे. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हिंदुस्थान भिडणार आहे. यावेळी लढत महिला संघांमध्ये असेल.

ऑस्ट्रेलियाने 339 धावांचे आव्हान ठेवून त्यांनी हिंदुस्थानी संघाची ‘घे ना, तू करून दाखव बघू!’ अशी चेष्टा केली. पण या वेळी हरमनप्रीतच्या टीमने ठरवले, ‘अब की बारी, हमारी बारी!’

सुरुवातीला शफाली वर्मा आणि स्मृती मानधना क्रीजवर आल्या तेव्हा सगळय़ांच्या हृदयाची धडधड ऑस्ट्रेलियन चेंडूपेक्षा जास्त वेगाने धावत होती. शफाली गेली, स्मृतीनेही निराश केले आणि स्कोअर झाला 2 बाद 59. तेव्हा टीव्हीसमोर बसलेले सारे क्रिकेटप्रेमी म्हणाले, ही तर गेली भाय! पण जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत काwर या दोघींनी ठरवलं – ‘कोशिश करनेवालो की कभी हार नहीं होती… पण ऑस्ट्रेलियन गोलंदाज जरूर थकले. दोघींचा खेळ म्हणजे कविता आणि करंट एकत्र. चौकार, झेल, फिरकी, आत्मविश्वास सगळं बिनचूक. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बॉलपेक्षा स्वतःचे नशीब फिरतंय असं वाटायला लागलं.

हरमनप्रीतने जबरदस्त 89 धावा पुटल्या. तिच्या बॅटमधून ठिणग्या निघत होत्या आणि स्टेडियममध्ये हरमन! हरमन! चा जयघोष होत होता. पण खरी कथा लिहिली ती जेमिमाने. 127 धावांची तिची खेळी म्हणजे ‘बॅट धरली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सगळा नूर उडून गेला. ती एकटी उभी राहिली, शेवटपर्यंत. एकदम मुलगी मस्त, मावळय़ांची आठवण करून देणारी! शेवटच्या क्षणी अमनजोत काwरने चौकार ठोकला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. मैदानावर जल्लोष, ऑस्ट्रेलियन चेहऱयावर गोंधळ आणि हिंदुस्थानी चाहत्यांच्या डोळय़ांत आनंदाश्रू. आता गेली चार दशके पाहत असलेले जगज्जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीची वेळ आलीय. आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठलीय. पण यावेळी हरना मना है.

त्याआधी  ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानसमोर 339 धावांचे आव्हान उभे केले. फिबी लिचफिल्डच्या शतकी (119) खेळीला एलिस पेरी (77) आणि अॅश्ले गार्डनर (63) यांनी दमदार साथ दिली. कांगारू महिलांनी 49.5 षटकांत 338 धावा करत उपांत्य फेरीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला. जखमी कर्णधार एलिसा हिली अनफिट असूनही मैदानात उतरली, पण ती विशेष काहीच करू शकली नाही.

आजचा दिवस माझ्या 50 किंवा 100 धावांसाठी नव्हता, आजचा दिवस हिंदुस्थानला जिंकवण्यासाठी होता. देवाने हे सगळं आधीच लिहून ठेवलं होतं असं वाटतं. गेल्या महिन्यात खूप ताण आणि अस्वस्थता होती, पण आज सगळं स्वप्नवत वाटतंय. मी काही स्वतःसाठी नाही, तर हिंदुस्थानला जिंकवण्यासाठी खेळले. आम्ही नेहमीच निर्णायक क्षणी हरायचो, पण आज ठरवलं होतंशेवटपर्यंत लढायचं आणि सामना जिंकायचाच.

Comments are closed.