सुनील तटकरेंनी नेहमीच आम्हाला फसवलं, आता शेवटचा हिशोब चुकता करणार; महेंद्र दळवींचा थेट इशारा
सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र दळवी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रोहा शहरात शिवसेना शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी तटकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका करत त्यांना थेट इशारा दिला. “रोहा कोणाच्याही मालकीची नाही. तटकरे यांनी आम्हाला वारंवार फसवलं, पण यावेळी हा शेवटचा हिशोब चुकता करू,” असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रसंगी बोलताना आमदार दळवी म्हणाले की, “तटकरे यांचा हा फसवणुकीचा धंदा आहे. त्यांनी गेल्या अनेक निवडणुकांत आमच्या पाठीमागे उभं राहून नेहमी गियर बदलला आणि आमच्याशी विश्वासघात केला. नगरपालिकेचे सर्व रेकॉर्ड, निधीचे विवेचन आमच्याकडे आहे. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही प्रत्येक मुद्द्याचा हिशोब मांडणार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला.
Mahendra Dalvi on Sunil Tatkare: लोकसभेला तटकरेंचे काम कदापि करणार नाही : महेंद्र दळवी
एकदा मला संधी द्या, असे आवाहन देखील महेंद्र दळवी यांनी रोहेकरांना केले. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही सुनील तटकरे यांचं काम कदापी करणार नाही.” विधानसभेच्या काळात तटकरे यांनी नेहमीप्रमाणे गियर बदलल्याचा आरोपही त्यांनी केला. या टीकेमुळे रोहा परिसरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. येत्या निवडणुकांमध्ये दळवी–तटकरे संघर्ष कोणत्या वळणावर जाईल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Aniket Tatkare on Mahendra Dalvi: अनिकेत तटकरेंचा महेंद्र दळवींना नाव न घेता इशारा
दरम्यान, रोहा शहरावर काही जण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना नाव न घेता इशारा दिला होता. काही दिवसांपूर्वी महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली काही स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तातडीची आढावा बैठक घेण्यात आली होती. बैठकीदरम्यान बोलताना अनिकेत तटकरे म्हणाले, “रोहा शहरावर काही जण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनील तटकरे यांना आव्हान देण्याचे काम काही जण करत आहेत. पण अशी आव्हाने परतवून लावण्याची ताकद आमच्यात आहे. आरेला कारे उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा आहे,” असे त्यांनी म्हटले. तर “कालची पोरं, ज्यांना वयाचा इतिहास-भूगोल माहीत नाही, तीही आज येऊन बोलतायत. सुनील तटकरे यांना कोणीही येऊन टपली मारून जाईल आणि आम्ही शांत बसू, असं होणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशारा अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी यांना दिला होता.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.