भ्रष्ट घराण्यातील राजपुत्रांकडून खोटे बोलणे
बिहारमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा शाब्दिक घणाघात : राहुल गांधी अन् तेजस्वी यादवांवर निशाणा
वृत्तसंस्था/मुजफ्फरपूर
बिहारमधील मुजफ्फरपूर येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. एक देशातील सर्वात भ्रष्ट परिवाराचा युवराज आहे तर दुसरा बिहारमधील सर्वात भ्रष्ट परिवाराशी संबंधित आहे. या दोन्ही युवकांनी मिळून सध्या खोट्या आश्वासनांचे दुकान उघडले आहे. दोघेही माझ्याबद्दल अपशब्द वापरत आहेत. परंतु बिहारचे लोक या युवराजांच्या असत्याच्या जाळ्यात अडकणार नाहीत. बिहारने आता विकासाचा वेग पकडला असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
दोन्ही युवराज हजारो कोट्यावधींच्या घोटाळ्यांप्रकरणी जामिनावर आहेत आणि जे जामिनावर असतात, त्यांचा सन्मान नसतो. चर्चेत राहण्यासाठी हे लोक काम करणाऱ्यांना शिव्या देत असतात. त्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही. मागास, दलितांना शिवी देणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे हे लोक मानतात. एक चहा विकणारा मागास गरीब घरातील व्यक्ती मोठ्या पदापर्यंत पोहोचला, हेच त्यांना सहन होत नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
लालूप्रसादांकडून आंबेडकरांचा अवमान
राजद आणि काँग्रेसचे नाते तेल आणि पाण्याप्रमाणे आहे. ते कधीच एकमेकांमध्ये मिसळले जाऊ शकत नाहीत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते परस्परांमध्ये एकमेकांना कमी लेखण्याचा खेळ करत आहेत. बाहेरून हे एक दिसत असले तरीही आतून वेगवेगळे आहेत. त्यांचा उद्देश केवळ सत्तेवर कब्जा करणे आहे. याच आमिषापोटी ते एकत्र येत पुन्हा बिहारला लुटता येईल, असा विचार करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण देश पूजा करतो, त्यांचा राजद प्रमुख लालूप्रसाद यादव हे अपमान करत असल्याचे मोदींनी जुन्या घटनेचा संदर्भाने म्हटले आहे.
राजद अन् काँग्रेसचा मोठा पराभव
राजद आणि काँग्रेसचा बिहारमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. तर रालोआचा सर्वात मोठा विजय होणार आहे. बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसला आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा देत बिहारचे मतदार इतिहास घडविणार आहेत. याचमुळे दोन्ही युवराज घाबरून गेले असून स्वत:च्या घोषणापत्रात इतकी खोटी आश्वासने देण्यात आली आहेत की, त्यांच्या समर्थकांनाही त्यावर विश्वास ठेवता येत नाही. सोशल मीडियावर बिहारचे युवा महाआघाडीच्या घोषणापत्राची चेष्टा करत आहेत. आगामी 6 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदारच राजद आणि काँग्रेसला त्याची खरी जागा दाखवून देतील असे मोदींनी म्हटले आहे.
 
			 
											
Comments are closed.