चिनी ड्रगनपुढे ट्रम्प नरमले! टॅरिफमध्ये 10 टक्क्यांची कपात

अमेरिकेच्या टॅरिफ नीतीला चीनने ‘जशास तसे’ उत्तर दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प नरमले आहेत. चिनी मालाच्या आयातीवरील टॅरिफ 10 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा आज ट्रम्प यांनी केली. त्यामुळे चीनवरील टॅरिफचा आकडा 57 टक्क्यांवरून 47 टक्क्यांवर येणार आहे.

दक्षिण कोरियातील बुसानमध्ये सुरू असलेल्या ‘अॅपेक’ शिखर परिषदेच्या निमित्ताने ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. दोन तासांच्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान, फेंटानील, दुर्मिळ खनिजे अशाच सर्वच मुद्दय़ांवर चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ कपातीची घोषणा केली. चीनने दुर्मिळ खनिजांची निर्यात करण्यास आणि अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

दुर्मिळ खनिजे आणि फेंटानील होता वादाचा मुद्दा

चीन आणि अमेरिकेतील व्यापारी तणावामागे दुर्मिळ खनिजे आणि फेंटानील दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर चीनने निर्बंध लादले होते. तसेच हेरॉईनपेक्षा दुप्पट शक्तिशाली असलेले फेंटानील हे मादक द्रव्य चीन मेक्सिकोतील ड्रग्ज कार्टेलना निर्यात करतो आणि तिथून ते पुढे अमेरिकेत येतात. औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या घटकामुळे अमेरिकेत आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. या फेंटानीलमुळे अमेरिकेने चीनवर 20 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले होते, मात्र यावर तोडगा काढण्यात आला आहे.

Comments are closed.