पाहुणचारासाठी बोलावले, जेवणात गुंगीचे औषध टाकले; विमा कंपनीच्या मॅनेजरचा महिलेवर अत्याचार

विमा कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका शाखा व्यवस्थापकाने पाहुणचाराच्या बहाण्याने जेवणात गुंगीचे औषध घालून आपल्या महिला सहकाऱ्यावर अत्याचार केला. शिवाय त्याच्या पत्नीने याचे चित्रीकरण करून पीडित महिलेकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी नराधम प्रदीप नरळेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पत्नी आणि भावाचा शोध पोलीस घेत आहेत.
नराधम प्रदीप नरळेची नागपूर शाखेत कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय महिला सहकाऱ्याशी कंपनीच्या ऑनलाइन मीटिंगदरम्यान ओळख झाली होती. कामाच्या निमित्ताने त्या दोघांमध्ये जवळीक वाढली. कामानिमित्त मुंबईत आलेल्या पीडित महिलेला प्रदीपने पनवेल येथील आपल्या घरी बोलावले. पाहुणचाराच्या बहाण्याने जेवणात गुंगाचे औषध मिसळले. ती बेशुद्ध झाल्यानंतर प्रदीपने तिच्यावर अत्याचार केला. याचे चित्रीकरण त्याची पत्नी रेणुका नरळे हिने केले. यात त्याचा भाऊ प्रवीण नरळेचाही सहभाग होता. चित्रीकरण केलेले व्हिडीओ दाखवून नराधमाने पीडित महिलेकडून लाखो रुपये उकळले.
सहा कोटींची फसवणूक करूनही आरोपी मोकाट
बोईसर – सहा कोटींची फसवणूक करणारा आरोपी मोकाट फिरत आहे. सुभाष पाटील असे आरोपीचे नाव असून त्याला मनोर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात ताब्यात घेतले. मात्र थातूरमातूर कारवाई करून सोडून दिले. त्यामुळे पोलीस नेमके कोणाच्या दबावाखाली आहेत, असा सवाल फिर्यादी संतोष गवळी यांनी केला आहे. संतोष गवळी आणि सुभाष पाटील यांच्या मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे प्रकल्पातील जमीन संपादित करण्यात आली होती. दोघे समभागीदार असतानाही सुभाष पाटील याने बनावट सही करून ६ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात वळवून फसवणूक केली.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
भाईंदर – काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिमीरा परिसरात २८ ऑक्टोबर रोजी दुपारी नराधमाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे तोंड दाबून जबरदस्तीने अत्याचार केला. मुलीने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांत धाव घेऊन कैफियत दिली.
 
			 
											
Comments are closed.