बिहारमध्ये जनसुराज पक्षाच्या नेत्याची हत्या

एनडीए उमेदवार अनंत सिंह यांच्यावर समर्थकांचा आरोप

वृत्तसंस्था/मोकामा

बिहारमधील मोकामा येथे गुरुवारी जनसुराज पक्षाचे उमेदवार पियूष प्रियदर्शी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या ताफ्यात असलेले राजद नेते दुलारचंद यादव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एनडीएचे उमेदवार अनंत सिंह यांना या हत्येसाठी जबाबदार धरले जात आहे. पियूष प्रियदर्शी यांचा ताफा अनंत सिंह यांच्या ताफ्याजवळून गेला तेव्हा अनंत सिंह यांच्या समर्थकांनी अचानक हल्ला केल्याचे सांगण्यात आले. पोलीस सध्या या आरोपांची चौकशी करत आहेत.

बिहार निवडणुकीच्या काही दिवस आधी, जनसुराज पक्षाचे उमेदवार पीयूष प्रियदर्शी यांच्या समर्थकाची हत्या केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनसुराज पक्षाशी संबंधित कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले असताना एनडीएचे उमेदवार अनंत सिंह यांचे समर्थक त्यांच्या मागावर होते. अनंत सिंह यांच्या उमेदवाराचा ताफा आमच्या वाहनांचा पाठलाग करत होते, अशी माहिती जनसुराज पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांना दिली. अनंत सिंह यांचे समर्थक अचानक वाहनांमधून बाहेर पडल्यानंतर जोरदार संघर्ष सुरू झाला. ही घटना मोकामा येथील घोसवारी येथे घडली.

अनंत सिंह यांच्या समर्थकांनी गाडीच्या काचा फोडतानाच काठ्या आणि रॉडने तोडफोड सुरू केली. हा एक प्राणघातक हल्ला होता. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि अनेक वाहनांच्या खिडक्या फुटल्या. या गोंधळानंतर परिसरात अधिक सुरक्षा फौजफाटा मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Comments are closed.